

नवी दिल्ली : दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची, तसेच शिस्तीचे पालन करून घेण्याची जबाबदारी सांभाळणारे पोलिस स्वतःच संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. सोमवारी दिल्ली पोलिस मुख्यालयाबाहेर खाकी वर्दीत पोहोचलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी आपल्या दोन अधिकाऱ्यांच्या बदलीविरोधात आंदोलन केले. आंदोलनात सुरुवातीला सुमारे १०० ते १५० पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते. नंतर ही संख्या ५०० पर्यंत पोहोचली. पोलिस खात्यातील या अभूतपूर्व घटनेने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या आंदोलनाचे नेतृत्व एसीपी मनस्वी वशिष्ठ करत होते. त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
या वादाची सुरुवात २३ ऑक्टोबर रोजी शहादरा पोलिस ठाण्यात पोलिस आणि वकिलांमध्ये झालेल्या चकमकीतून झाली होती. वकील ललित बन्सल यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर वकिलांनी पोलिसांवर गैरवर्तन केल्याचा आणि प्रकरणात योग्य कारवाई न केल्याचा आरोप केला. एसीपी मनस्वी वशिष्ठ यांनी असभ्य वर्तणूक केली आणि आपली सर्व्हिस रिव्हॉल्व्हर दाखवली, असा आरोप वकिलांनी केला होता. मात्र, एसीपींनी हे आरोप फेटाळून लावले होते. दुसरीकडे, पोलिसांच्या वतीनेही वकिलांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा आणि कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला. वाद वाढल्याने दिल्लीतील जिल्हा न्यायालयांच्या वकिलांनी अनिश्चित काळासाठी संप सुरू केला होता.
प्रकरण शांत करण्यासाठी २८ ऑक्टोबर रोजी पोलिस मुख्यालयाने एसीपी मनस्वी वशिष्ठ यांची, तसेच शहादरा पोलिस ठाण्याचे एसएचओ निरीक्षक अरुण कुमार यांचीही सुरक्षा विभागात रवानगी करण्यात आली. यानंतर वकिलांनी संप मागे घेतला. मात्र, या बदल्यांमुळे पोलिस दलातील एका वर्गात नाराजी पसरली. दुसरी बाजू न ऐकताच अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याचे पोलिस कर्मचाऱ्यांचे म्हणणे होते. याच निषेधार्थ सोमवारी पोलिस कर्मचारी मुख्यालयाबाहेर जमले आणि दोन्ही अधिकाऱ्यांना परत आधीच्या जागी बदली करण्याची मागणी केली. एसीपी वशिष्ठ यांच्या तक्रारीवरून नोंदवलेली एफआयआर रद्द करू नये आणि प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणीही आंदोलकांनी केली.
दिल्ली पोलिस आयुक्त अनुग्रह कुमार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिस कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. पोलिसांच्या समस्यांचे वेळेत निवारण केले जाईल, असे आश्वासन त्यांना देण्यात आले. दुसरीकडे मंगळवारी, मनस्वी वशिष्ठ यांना निलंबित करण्यात आले.