

Delhi Mumbai Expressway Accident
नवी दिल्ली : दिल्ली-मुंबई महामार्गावर गेल्या आठवड्यात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने प्रशासन आणि सामान्य लोकांच्या संवेदनेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. एका भीषण अपघातानंतर तब्बल आठ तास छिन्नविछिन्न कारमध्ये अडकून रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या एका दिल्लीतील जोडप्याचा मदतीअभावी मृत्यू झाला. वेळेवर मदत मिळाली असती तर त्यांचे प्राण वाचले असते, असा आक्रोश मृतकांच्या कुटुंबियांनी केला असून, महामार्गरील पोलिसांचे पेट्रोलिंग केवळ कागदावरच सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
गेल्या मंगळवारी लच्छी राम (वय ४२) आणि त्याची पत्नी कुसुम लता (वय ३८) यांच्या कारचा अपघात झाला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांच्या गाडीला २२ मिनिटांमध्ये इतर दोन वाहनांनी धडक दिली. धडकेनंतर दोन्ही वाहनचालकांनी न थांबता त्यांना तशाच स्थितीत कारमध्ये अडकलेले सोडून दिले. रात्रभर अनेक वाहने त्या छिन्नविछिन्न कारजवळून गेली, पण कोणीही मदतीसाठी थांबले नाही. तब्बल ८ तास गंभीर जखमी अवस्थेत हे जोडपे कारमध्येच होते आणि त्यांच्या शरिरातून रक्तस्त्राव सुरू होता.
सीसीटीव्ही फुटेजनुसार, एका ट्रकने या जोडप्याच्या कारला धडक दिली आणि बाजूच्या लेनमध्ये ढकलले. त्यानंतर २२ मिनिटानी भरधाव वेगाने आलेल्या दुसऱ्या कारने धडक दिली. यानंतर त्या चालकाने गाडी रिव्हर्स घेऊन पळ काढला. पहिल्या धडकेनंतर जखमी झालेल्या या जोडप्याला बाहेर काढण्यासाठी कोणताही चालक खाली उतरला नाही. परंतु खरी भयंकर गोष्ट नंतर घडली. जवळजवळ आठ तास, ती छिन्नविछिन्न झालेली कार एक्स्प्रेस वेच्या बाजूला पडून होती, तिचे दरवाजे जाम झाले होते आणि आतील या जोडप्याचा रक्तस्राव होत होता आणि शेकडो वाहने बाजूने निघून जात होती.
रात्री १२ च्या सुमारास झालेल्या अपघाताची माहिती पोलिसांना सकाळी ८ वाजता समजली. म्हणजेच पहिल्या धडकेनंतर जवळजवळ आठ तास पोलिसांना माहिती नव्हेत.
या जोडप्याच्या नातेवाईकांनी या घटनेला आणि त्यांच्या मृत्यूला प्रशासनाला जबाबदार धरले आहे. रामचे मामा नाहर सिंह म्हणाले, “दोन व्यक्ती अडकलेल्या आणि रक्तस्राव होत असलेल्या संपूर्ण छिन्नविछिन्न कारकडे सगळ्यांचे दुर्लक्ष कसे होऊ शकते? याचा अर्थ आहे की, एकतर ते निष्काळजी होते किंवा पोलिसांचे पेट्रोलिंग फक्त कागदावरच होत आहे. आम्हाला सांगण्यात आले होते की, नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) ची गस्ती वाहने दर तासाला येथून जातात. त्यांना ही चिरडलेली कार कशी दिसली नाही?” असा प्रश्न त्यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले की, महामार्गाच्या या भागावर NHAI आणि स्थानिक पोलीस दोन्ही लक्ष ठेवतात, अशी माहिती आम्हाला देण्यात आली होती. अपघातानंतर पोलीस गस्त पथके कुठे होती? जर त्यांना वेळेवर मदत मिळाली असती, तर ते वाचले असते.”
रामचे वडील देवी सिंह (वय ६४) सांगतात की, “त्यांचा मृत्यू अशा प्रकारे व्हायला नको होता. जरी ते जखमी झाले असते किंवा आयुष्यभर अपंग झाले असते, तरी आम्ही त्यांची काळजी घेतली असती. पण मदतीसाठी कोणीतर येईल म्हणून वाट पाहत मरून जाणे, हे नको होतं. अधिकारी इतके बेजबाबदार कसे असू शकतात?” असा प्रश्न त्यांनी केला आहे. रात्रभर त्यांच्या फोनवर कॉल करत राहिलो. पहिला कॉल झाला पण उचलत नव्हते, नंतर तो बंद झाला. सकाळी ८ वाजल्यानंतर, फोन पुन्हा वाजायला लागला आणि एका पोलिसाने उचलला. तेव्हा आम्हाला त्यांच्या मृत्यूची माहिती मिळाली.”
रामचा चुलत भाऊ दीपक सिंह म्हणाला की, “वहिनीला कोणतीही जखम नव्हती. वेळेवर मदत मिळाली असती, तर ती वाचली असती. रामच्या डोक्याला गंभीर दुखापती होत्या आणि पाय फ्रॅक्चर झाले होते, पण तरीही, जर कोणी थांबले असते तर ते वाचले असते.”