

Iran–Israel Conflict Impact
नवी दिल्ली : मध्यपूर्वेतील (इराण-इस्रायल) वाढत्या तणावामुळे हवेतच उड्डाणांवर अचानक निर्बंध आल्याने दिल्लीहून मँचेस्टरला जाणाऱ्या इंडिगोच्या 6E 31 विमानाला ७ तासांचा प्रवास केल्यानंतर अर्ध्या वाटेतूनच माघारी फिरावे लागले. हे विमान दिल्लीहून मँचेस्टरला जात होते. विमानाने ७ तास प्रवास केल्यानंतर थिओपिया आणि एरिट्रिया देशांच्या सीमेजवळ पोहोचले होते. युद्धाच्या परिस्थितीमुळे अचानक 'एअरस्पेस' (हवाई मार्ग) बंद करण्यात आला किंवा त्यावर निर्बंध आले. सुरक्षेच्या कारणास्तव वैमानिकाने विमान पुन्हा दिल्लीला नेण्याचा निर्णय घेतला. ७ तास पुढे गेल्यानंतर विमान पुन्हा तितकाच प्रवास करून दिल्लीला परतले.
फ्लाइटराडार२४ या विमान ट्रॅकिंग सेवेनुसार, नॉर्स कंपनीद्वारे चालवले जाणारे इंडिगोचे विमान (6E 33) इथिओपिया आणि एरिट्रियाच्या सीमेजवळ पोहोचले होते, परंतु तिथून ते पुन्हा दिल्लीकडे वळवण्यात आले. २६ फेब्रुवारीनंतर सुरू झालेली ही पहिलीच दिल्ली-मँचेस्टर थेट विमानसेवा होती, जी साधारण ११ तासांचा प्रवास करून पोहोचणे अपेक्षित होते. विशेष म्हणजे, पश्चिम आशियातील युद्धाग्रस्त हवाई भाग टाळण्यासाठी लांबचा सुरक्षित मार्ग निवडला असूनही, ७ तासांच्या प्रवासानंतर सुरक्षेच्या कारणास्तव विमानाला यू-टर्न घ्यावा लागला.
फ्लाइटराडार२४ नुसार, इराण आणि इस्रायलमधील तणावामुळे विमानाने मध्य पूर्वेतील नेहमीचा मार्ग टाळून एडनचे आखात आणि आफ्रिकेवरून जाणारा एक वेगळा दक्षिण मार्ग निवडला होता. युद्धाचा भाग टाळण्यासाठी हा लांबचा आणि सुरक्षित मार्ग निवडला असूनही, पश्चिम आशियातील विमान उड्डाणांचे नियम (हवाई निर्बंध) इतक्या वेगाने बदलले की, सुरक्षित क्षेत्रात असूनही खबरदारी म्हणून विमानाला अर्ध्या वाटेतूनच मागे फिरावे लागले.
इंडिगोच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले की, मध्यपूर्वेतील बिघडत चाललेल्या परिस्थितीमुळे विमान वळवण्याचा निर्णय घ्यावा लागला. हवाई क्षेत्रावर (Airspace) अचानक नवीन निर्बंध लागू झाल्यामुळे, दिल्लीहून मँचेस्टरला निघालेले 6E 033 विमान सुरक्षेसाठी पुन्हा दिल्लीला परतले. प्रवक्त्यांच्या मते, सध्याच्या युद्धजन्य तणावामुळे येणाऱ्या काळात इतर काही विमानांचे मार्ग बदलू शकतात किंवा प्रवासाला जास्त वेळ लागू शकतो.
२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने मिळून इराणवर मोठा लष्करी हल्ला केला, ज्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मध्यपूर्वेत युद्धाला सुरुवात झाली आहे. प्रत्युत्तर म्हणून इराण आता आखाती देशांमधील अमेरिका आणि इस्रायलच्या लष्करी तळांना लक्ष्य करत आहे, तर दुसरीकडे हे दोन्ही मित्र राष्ट्रदेखील इराणवर सतत हल्ले करत आहेत.