पुढारी ऑनलाईन डेस्क
सध्या जम्मूमध्ये कार्यरत असलेल्या दहशतवादी गटातील एक अथवा दोन दहशतवादी स्वातंत्र्य दिनाच्या दरम्यान दिल्ली किंवा पंजाबमध्ये आत्मघाती हल्ल्याचा प्रयत्न करू शकतात, अशी माहिती मिळाल्यानंतर गुप्तचर यंत्रणा हाय अलर्टवर (Delhi High Alert) आहे. पण गुप्तचर यंत्रणांनी हेदेखील सूचित करते की सुरक्षा दलांच्या मोठ्या प्रमाणातील तैनातीमुळे १५ ऑगस्टला (Independence Day) हल्ल्याची योजना आखली गेली नसावी. परंतु एक किंवा दोन दिवसांनी आत्मघाती हल्ल्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
"जम्मू आणि काश्मीरमधील कठुआच्या सीमेला लागून असलेल्या एका गावात शस्त्रांसह दोन अज्ञात व्यक्तींच्या हालचाली हालचाली दिसून आल्या आहेत. ते जवळच्या पठाणकोट शहराकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही," असे एका गुप्तचर माहितीच्या हवाल्याने सूत्राने सांगितले.
"१ जून रोजी स्फोटकांची/आयईडीची एक खेप जम्मू शहराच्या एका अंतर्गत भागात पोहोचली. या स्फोटकांचा वापर पुढील काही दिवसांत सुरक्षा आस्थापने, छावण्या, वाहने अथवा महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यासाठी केला जाऊ शकतो," असे सुत्रांनी पुढे म्हटले आहे.
गुप्तचर सूत्रांच्या माहितीनुसार, पंजाब आणि जम्मू आणि काश्मीरच्या लगतच्या भागात कार्यरत असलेले आयएसआय पुरस्कृत गँगस्टर्स, कट्टरपंथी आणि दहशतवाद्यांचा स्वातंत्र्य दिन आणि अमरनाथ यात्रा विस्कळीत करण्याचा प्रयत्न करत होता. "१५ ऑगस्टच्या आसपास मोठ्या समुहाला लक्ष्य करण्यासाठी घातक आयईडी स्फोटकांचा वापर केला जाऊ शकतो," या पार्श्वभूमीवर अलर्टमध्ये पुढे म्हटले आहे की, "सरकारच्या काही निर्णयांचा अथवा कारवाईचा बदला घेण्याच्या शक्यतेमुळे हा धोका आणखी वाढला आहे.''
मिळालेल्या माहितीनुसार, "कठुआ, डोडा, उधमपूर, राजौरी आणि पूंछ जिल्ह्यांतील अलीकडील काही दहशतवादी हल्ल्यांमुळे जम्मू प्रदेशात सशस्त्र दहशतवादी गट सक्रिय असल्याचे उघड झाले आहे. या माहितीवरुन या दहशतवादी संघटनांचा उद्देश आणि नियोजन उघड झाले आहे. उच्च-पदस्थ प्रतिष्ठित व्यक्ती, आस्थापने, प्रसिद्ध आणि महत्वाची ठिकाणे आणि गर्दीच्या ठिकाणांना लक्ष्य करून घातपात घडविण्याचा दहशतवादी संघटनांचा कट असल्याची माहिती मिळाली आहे. लष्कर ए तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदचा दिल्लीला लक्ष्य करण्याचा कट असल्याचेदेखील नमूद करण्यात आले आहे.” या पार्श्वभूमीवर दिल्लीत १५ ऑगस्टपर्यंत सुरक्षा व्यवस्था वाढवण्याबाबत सतर्क करण्यात आले आहे.