नवी दिल्ली, वृत्तसंस्था : 2036 अखेर देशाची लोकसंख्या 152.2 कोटींवर पोहोचणार असून स्त्री-पुरुष प्रमाणामध्ये मात्र सुधारणा होणार असल्याचे केंद्र सरकारने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे.
केंद्रीय सांख्यिकी विभागाने हा अहवाल प्रसारित केला आहे. यामध्ये म्हटल्यानुसार 2036 पर्यंत देशाची लोकसंख्या 152.2 कोटींवर पोहोचण्याची शक्यता आहे. 2011 साली पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे प्रमाण 48.5 टक्के होते. 2036 पर्यंत मुलींच्या जन्म दरात वाढ होऊन हे प्रमाण 48.8 टक्क्यांवर जाईल. जन्म दरात घट होत असल्याने या कालावधीत 15 वर्षाखालील अल्पवयीनांमध्येही घट होण्याची चिन्हे आहेत. याउलट 60 वर्ष आणि 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येत मात्र या कालावधीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 2011 च्या तुलनेत 2036 पर्यंत लोकसख्येमध्ये स्त्रियांच्या प्रमाणात वाढ होणार आहे. 2011 साली पुरुषांच्या तुलनेत (दर हजारी) स्त्रियांचे प्रमाण 943 होते. हे प्रमाण उपरोक्त कालावधीत 952 वर जाणार आहे.
स्त्री-पुरुष समानतेसाठी लिंगभेदाची आकडेवारी महत्त्वपूर्ण आहे. ध्येयधोरण निश्चित करण्यासाठी स्त्री-पुरुषांची आकडेवारी महत्त्वपूर्ण ठरत असल्याने केंद्राने हा अहवाल तयार केला आहे. साक्षरता, आरोग्य आणि कल्याणकारी योजनांसाठी हा डाटा महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे सूत्रांनी सांगितले.