Jammu and Kashmir | मोठ्या कारवाईचे संकेत! राजनाथ सिंह यांची आर्मी प्रमुखांशी चर्चा

'काश्मीर टायगर्स'ने स्वीकारली डोडा हल्ल्याची जबाबदारी
Jammu and Kashmir Doda encounter
डोडा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आर्मी प्रमुखांशी संवाद साधला.file photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू आणि काश्मीरच्या (Jammu and Kashmir) डोडा जिल्ह्यात सोमवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत (Doda encounter) एका अधिकाऱ्यासह चार सुरक्षा जवान शहीद झाले. या हल्ल्याची जबाबदारी 'काश्मीर टायगर्स' या पाकिस्तान समर्थक जैश-ए-मोहम्मद (JeM) शी संलग्न असलेल्या दहशतवादी गटाने स्वीकारली आहे.

दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय आर्मी प्रमुखांशी संवाद साधला. चीफ ऑफ ऑफ द आर्मी स्टाफ (सीओएएस) जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केलेल्या दूरध्वनी संभाषणात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना डोडा येथील सद्यपरिस्थितीची माहिती दिली, अशी माहिती सुत्रांनी दिली. तसेच राजनाथ सिंह यांनी आर्मी प्रमुखांना दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी सर्वाधिकार दिल्याचे वृत्त आहे.

Jammu and Kashmir Doda encounter
जम्मू-काश्मिरमध्ये चकमक; एका अधिकाऱ्यासह ४ जवान शहीद

'देश शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभा'

''उरार बग्गी, डोडा (J&K) येथे दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत आपल्या शूर आणि धाडसी भारतीय सैन्याच्या जवानांना गमावल्याबद्दल खूप दुःख झाले. देशासाठी कर्तव्य बजावत असताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी देश खंबीरपणे उभा आहे. दहशतवादी कारवायांना चोख प्रत्युत्तर दिले जात आहे आणि आमचे जवान दहशतवादाचा समूळ नायनाट करण्यासाठी आणि प्रदेशात शांतता आणि सुव्यवस्था सुरळीत करण्यासाठी वचनबद्ध आहेत.'' असे राजनाथ सिंह यांनी X ‍‍वर पोस्टमध्ये म्हटले आहे.

राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुप (SOG) च्या सुरक्षा जवानांनी सोमवारी संध्याकाळी उशिरा डोडा शहरापासून सुमारे ५५ किमी अंतरावर असलेल्या देसा वन पट्ट्यातील धारी गोटे उररबागी येथे संयुक्त घेराव आणि शोध मोहीम सुरू केली होती. या दरम्यान ही चकमक झाली.

एका अधिकाऱ्यासह ४ जवान शहीद

या चकमकीनंतर दहशतवाद्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण घनदाट जंगल असूनही सुरक्षा जवानांनी त्यांचा पाठलाग केला. रात्री सुमारे ९ वाजता जंगलात आणखी चकमक झाली. या चकमकीत ५ सुरक्षा जवान जखमी झाले आणि एका अधिकाऱ्यासह ४ जवान शहीद झाले, अशी पुष्टी अधिकाऱ्यांनी केली.

Jammu and Kashmir Doda encounter
Doda Encounter | जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये चकमक, २ दहशतवादी ठार

'काश्मीर टायगर्स'ने स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी

एका जारी केलेल्या निवेदनात, 'काश्मीर टायगर्स' या दहशतवादी गटाने म्हटले आहे की सुरक्षा दलांनी 'मुजाहिदीन'साठी शोध मोहीम सुरू केली असताना चकमक आणि गोळीबार झाला. 'काश्मीर टायगर्स' हा तोच दहशतवादी गट आहे ज्याने यापूर्वी ९ जुलै रोजी कठुआमध्ये लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news