

Dalai Lama reincarnation Tibet China India Buddhism dalai lama successor Gaden Phodrang Trust
धर्मशाळा : तिबेटी धर्मगुरू 14 वे दलाई लामा (तेन्झिन ग्यात्सो) यांनी त्यांच्या उत्तराधिकारीच्या निवडीबाबत चीनच्या हस्तक्षेपाला ठामपणे विरोध दर्शवत, पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की, त्यांच्या पुनर्जन्माची प्रक्रिया पारंपरिक तिबेटी बौद्ध पद्धतीनेच होणार आहे आणि याचा एकमेव अधिकार गदेन फोड्रंग ट्रस्टकडेच आहे.
दलाई लामांनी एका अधिकृत निवेदनातून सांगितले की, “गदेन फोड्रंग ट्रस्टशिवाय कोणालाही माझ्या पुढील पुनर्जन्मात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही.” त्यांनी ही घोषणा त्यांच्या 90 व्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर केली असून, चीनच्या या मुद्द्यावर केलेल्या दाव्यांना थेट आव्हान दिले आहे.
दलाई लामांनी 2011 मध्ये घेतलेल्या एका निर्णयाचा पुनःउच्चार करत सांगितले की, पुढील दलाई लामाची निवड गदेन फोड्रंग ट्रस्टच्या नेतृत्वातच होईल. यासाठी तिबेटी बौद्ध परंपरेतील प्रमुख धर्मगुरू आणि धर्मपालक (Dharma Protectors) यांचाही सल्ला घेतला जाईल.
तसेच त्यांनी 1969 मध्ये केलेल्या विधानाची आठवण करून दिली – की, दलाई लामा संस्था सुरू ठेवायची की नाही, हे निर्णय तिबेटी लोकांवर आणि तिबेटी बौद्ध धर्माच्या अनुयायांवर सोडावे.
चीन सरकारने पूर्वीच दावा केला होता की, पुढील दलाई लामाची निवड त्यांनीच केली पाहिजे. चीनच्या या भूमिकेमुळे अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. परंतु दलाई लामांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे चीनच्या मनसुब्यांना मोठा झटका बसला आहे.
दलाई लामांनी केलेल्या पुनर्जन्मासंबंधीच्या ताज्या घोषणेमुळे चीन संतप्त आहे, याची अनेक ठोस कारणं आहेत.
राजकीय नियंत्रण गमावण्याची भीती- चीनने गेल्या काही दशकांपासून तिबेटवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी धर्माचा वापर करण्याचा प्रयत्न केला आहे. दलाई लामांचा पुनर्जन्म जर तिबेटी परंपरेनुसार, चीनबाहेर झाला, तर चीनचा "आपला दलाई लामा निवडण्याचा" प्लॅन फसतो.
धार्मिक वैधतेवर आव्हान- दलाई लामांनी घोषित केलं आहे की: "फक्त गदेन फोड्रंग ट्रस्टलाच माझ्या पुनर्जन्माची ओळख पटवण्याचा अधिकार आहे, चीनला नाही." यामुळे चीनने निवडलेल्या 'सरकारी दलाई लामा'ला तिबेटी बौद्ध धर्मगुरूंनी मान्यता न दिल्यास, तो फक्त "राजकीय कठपुतळी" ठरेल. यामुळे चीनची आंतरराष्ट्रीय प्रतिमा डागाळते.
जागतिक बौद्ध समुदायाची सहानुभूती भारताकडे वळण्याची भीती- भारत, नेपाळ, मंगोलिया, रशिया, जपान, श्रीलंका आदी देशांतील बौद्ध अनुयायांचा झुकाव दलाई लामा आणि तिबेटी परंपरेकडे आहे – चीनकडे नाही.
दलाई लामांचा पुनर्जन्म भारतात किंवा परदेशात झाला, तर जागतिक बौद्ध नेतृत्व भारताकडे वळण्याची शक्यता आहे, जी गोष्ट चीनला अजिबात मान्य नाही.
दलाई लामांनी खुलासा केला की, गेल्या 14 वर्षांत त्यांना तिबेट, निर्वासित तिबेटी समाज, भारत, मंगोलिया, रशिया आणि अगदी चीनमधील बौद्ध अनुयायांकडून शेकडो संदेश आले. या सर्वांनी दलाई लामा संस्थेच्या सातत्याबाबत कळकळीची विनंती केली होती.
त्यांच्या भावना लक्षात घेऊन दलाई लामांनी आता स्पष्टपणे सांगितले आहे की, “दलाई लामांची परंपरा पुढे सुरू राहील. पण ती कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय, फक्त धार्मिक आणि परंपरेनुसारच होईल.”
चीनविरुद्ध संभाव्य संघर्षाची नांदी?
दलाई लामांचे हे निवेदन तिबेटच्या भविष्यावर दूरगामी परिणाम करणारे मानले जात आहे. चीनने वारंवार संकेत दिले आहेत की, ते स्वतःचा दलाई लामा निवडणार आहेत. अशा परिस्थितीत जगाला दोन दलाई लामा दिसू शकतात – एक तिबेटी बौद्ध परंपरेनुसार निवडलेला आणि दुसरा चीनकडून पाठिंबा मिळालेला.
विशेषतः भारतासाठी ही एक रणनीतिक कूटनीतिक संधी ठरू शकते, कारण चीनच्या बौद्ध जगतातील पकडीत मोठा तडा जाऊ शकतो.
दलाई लामा 6 जुलै रोजी 90 वर्षांचे होत आहेत. मॅक्लोडगंज, धर्मशाळा येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मध्यवर्ती तिबेटी प्रशासनाचे प्रमुख सिक्योंग पेन्पा त्सेरिंग व इतर मंत्रिगण उपस्थित राहणार आहेत. याच कार्यक्रमात दलाई लामा पुढील उत्तराधिकारीबाबत अधिक तपशील देऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दलाई लामा यांचे पुनर्जन्म (Reincarnation) हा तिबेटी बौद्ध धर्मातील एक महत्त्वाचा धार्मिक विश्वास आहे. यानुसार, दलाई लामा हे अवलोकितेश्वर (करुणेचे बोधिसत्व) यांचे मानव रूप मानले जाते आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा आत्मा पुन्हा एका नव्या शरीरात जन्म घेतो.
जेव्हा विद्यमान दलाई लामा मृत पावतात, तेव्हा असे मानले जाते की त्यांचा आत्मा दुसऱ्या शरीरात पुनर्जन्म घेतो. वरिष्ठ भिक्षू आणि लामा विशेष ध्यानधारणा, स्वप्ने, पवित्र तलावांतील संकेत, आकाशातील चिन्हे इ. चा अभ्यास करून पुढील दलाई लामाचा जन्म कुठे झाला असेल हे शोधतात.
योग्य बालक आढळल्यास, त्याला पूर्वीच्या दलाई लामांच्या वस्तू इतर वस्तूंमध्ये ठेवून ओळखण्यास सांगतात. जर बालक योग्य वस्तू ओळखतो, तर हे पुनर्जन्माचे महत्त्वाचे लक्षण मानले जाते. योग्य चाचण्या झाल्यावर त्या बालकाला दलाई लामाचा पुनर्जन्म म्हणून मान्यता दिली जाते आणि त्याचे बौद्ध शिक्षण सुरू होते.
दलाई लामा म्हणजे केवळ एक व्यक्ती नव्हे, तर करुणा, शांती आणि अध्यात्म यांचे मूर्तिमंत प्रतीक मानले जाते. प्रत्येक दलाई लामा हा मागील दलाई लामाचा आत्मिक उत्तराधिकारी असतो.