

CSDC Co Director Sanjay Kumar on Maharashtra Poll Data
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील मतदारांच्या आकडेवारीवरुन महत्त्वाचा खुलासा समोर आला आहे. विधानसभा निवडणुकीबाबतची आकडेवारी देताना चूक झाल्याची कबुली लोकनीती-सीएसडीएसचे सह-संचालक संजय कुमार यांनी दिली आहे. त्यांनी याबाबत आज मंगळवारी (दि. १९ ऑगस्ट) त्यांच्या पोस्टबाबत माफी मागितली. दुसरीकडे संजय कुमार यांच्या माफीनाम्यानंतर भाजप आक्रमक झाली असून राहुल गांधींची नाचक्की झाल्याचे भाजपने म्हटले आहे.
संजय कुमार यांनी नेमका काय दावा केला होता?
संजय कुमार यांनी 17 ऑगस्ट रोजी X वर पोस्ट शेअर केली होती. यात त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत दोन विधानसभा मतदारसंघांमधील मतदारांच्या संख्येत लक्षणीय घट झाली. तर नाशिक पश्चिम आणि हिंगणा या विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदारांची संख्या अनुक्रमे 47 आणि 43 टक्क्यांनी वाढल्याचा दावा त्यांनी केला होता.
मंगळवारी त्यांनी याच पोस्टबाबत स्पष्टीकरण दिले. महाराष्ट्रातील निवडणुकीची आकडेवारी देताना चूक झाल्याचे सांगत माफी मागितली आहे. त्यांनी याबाबत केलेल्या X वरील पोस्टनंतर भाजप आक्रमक झाली आहे.
''महाराष्ट्र निवडणुकीसंदर्भात केलेल्या पोस्टबद्दल मी मनापासून माफी मागतो. आमच्याकडून २०२४ मधील लोकसभा निवडणूक आणि २०२४ मधील विधानसभा निवडणुकीतील आकडेवारीची तुलना करताना चूक झाली. आमच्या टीमने ओळीत दिलेली आकडेवारी वाचताना चूक केली. त्यानंतर याबाबत केलेले ट्विट डिलीट केले. याबद्दल कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती पसरवण्याचा माझा हेतू नव्हता.'' असा खुलासा संजय कुमार यांनी पोस्टमधून केला आहे.
संजय कुमार यांनी 'पुढारी न्यूज'शी बोलताना म्हटले आहे, ''आम्ही लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीतील आकडेवारीची तुलना करत होते. पण वाचताना ओळी वर खाली झाल्या. यामुळे चुकीच्या मतदारसंघातील आकडेवारीशी तुलना झाली. ही आमची आकडेवारी नाही. ही निवडणूक आयोगाच्या साईटवर आकडेवारी होती. ती आमच्याकडे घेऊन आकडेवारीची तुलना करण्याचा प्रयत्न केला. पण ओळी वर खाली झाल्या. यामुळे आकडेवारी वाचताना गोंधळ झाला. यामुळे मी याबाबत केलेली पोस्ट डिलीट केली. आमच्याकडून चूक झाली असल्याचे आम्ही लोकांना सांगितले आहे.
मतचोरीवरून निवडणूक आयोगाविरोधात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जनमोहीम उघडली आहे. राहुल गांधी आणि इतर विरोधकांनी याच आकडेवारीच्या आधारावर महाराष्ट्रातील निवडणुकीत घोळ झाल्याबाबत जनमोहीम सुरु केली आहे का? असे विचारले असता संजय कुमार यांनी, राहुल गांधी यांनी ज्या आकडेवारीचा वापर केला त्याचा माझ्या आकडेवारीसाठी संबंध नसल्याचे स्पष्ट केले.
संजय कुमार यांच्या माफीनाफ्यावर सत्ताधारी भाजपकडून प्रतिक्रिया आली आहेत. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी X वर पोस्ट करत म्हटले, 'काही दिवसांपूर्वी, प्रोफेसर आणि लोकनीतीचे सह-संचालक संजय कुमार यांनी पोस्ट केली होती की सांख्यिकीय पुराव्यांसह महाराष्ट्रातील रामटेक आणि देवळी मतदारसंघातील निकालांत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील आकडेवारीत धक्कादायक तफावत दिसून आली आहे. ज्यातून मतदारांच्या फसवणुकीचे संकेत मिळत आहेत. काँग्रेसने या दाव्याचा आधार घेत निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. आता, संजय कुमार यांनी आपल्या चुकीची कबुली दिली असून त्यांनी पोस्ट डिलीट करून याबाबत माफी मागितली आहे.''
पण खरा प्रश्न असा आहे की त्या पोस्टवरुन जाणूनबुजून रचलेल्या खोट्या नॅरेटिव्हची जबाबदारी कोण घेते?, असा सवाल त्यांनी केला आहे. बिनबुडाचा आरोप करा, गोंधळ निर्माण करा आणि चूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शांतपणे माफी मागा. संजय कुमार यांची माफी कदाचित या सर्व प्रकरणातील पहिलीच असावी. जर राहुल गांधी यांच्यापर्यंत हे पोहोचले तर आश्चर्यचकित होऊ नका, त्यांच्यासाठी माफी मागणे काही नवीन गोष्ट नाही, अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे.