

बंगळूर : अय्यप्पा भक्तांना घेऊन जाणाऱ्या क्रूझरने रस्त्याकडेला थांबलेल्या लॉरीला धडक दिल्याने एका मुलीसह चौघे ठार झाले. तुमकूर जिल्ह्यातील कोरा येथे शुक्रवारी (दि. 9) हा अपघात झाला. साक्षी (वय 7), व्यंकटेशप्पा (वय 30), मारतप्पा (वय 35) आणि गविसिद्दप्पा (वय 40, सर्व काकनूर, जि. कोप्पळ) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात प्रशांत (वय 32), प्रवीणकुमार (वय 28), राजप्पा (वय 45), उलगप्पा (वय 36), राकेश (वय 24), तिरुपती (वय 33) आणि श्रीनिवास (वय 32) असे सातजण जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, काकनूरमधील 11 भाविक सोमवारी (दि. 5) क्रूझर वाहनाने शबरीमालाला जाण्यासाठी निघाले होते. ते बुधवारी (दि. 7) शबरीमलाला पोहोचले. अय्यप्पांचे दर्शन घेऊन गुरुवारी (दि. 8) तामिळनाडूतील पलानी मंदिरात गेले. दुपारी पलानीहून निघून बंगळूरुहून तुमकुरमार्गे कोप्पळकडे ते जात होते. शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर कोराजवळील वसंतनरसपुरा औद्योगिक क्षेत्राजवळ येत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने क्रूझरने रस्त्याकडेला थांबलेल्या लॉरीला धडक दिली. त्यात तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर एकाचा रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कोरा पोलिसांनी घटनास्थळी पोचून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली. चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक सागर मुस्की यांनी कोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक आणि डीवायएसपी चंद्रशेखर यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली.