

Bhandara Nagpur Highway Road Accident
भंडारा : नवरदेवाचा बोहल्यावर चढण्यापूर्वीच रस्ता अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना भंडारा नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील पिपरी (पू.) जवळील कवडसी फाटा येथे गुरुवारी (दि.८) रात्री ८ वाजता घडली. रविवारी (दि.११) लग्न होते, त्याची तयारी घरात सुरू असताना कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
पिपरी (पू.)जवळील कवडसी फाटा येथे काल रात्री राष्ट्रीय महामार्गावर ट्रकने पायी जात असणाऱ्या युवकाला धडक दिल्याने दुर्गेश किशोर लांजेवार ( वय ३३, रा.वॉर्ड क्रमांक २ आंबेडकर वॉर्ड ठाणा पेट्रोल पंप (ता. भंडारा) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. दुर्गेशचा गावातीलच युवतीशी विवाह होणार होता. लग्नाची तयारी सुरु असताना पिपरी पू.जवळील कवडसी फाटा येथे काही कामानिमित्त गेला होता. रस्ता ओलांडत असताना भंडारा कडून नागपूरकडे जात असलेल्या भरधाव ट्रकने (एम.एच.१४ एल. एक्स.४२१९ (MH 14 LX 4219) त्याला धडक दिली. यात दुर्गेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याने लांजेवार परिवारावर शोककळा पसरली आहे.
याबाबत जवाहरनगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दुर्गेश हा कुटुंबातील कर्ता पुरुष असल्यामुळे त्याच्या अपघाती निधनामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. येत्या ११ जानेवारीला रोजी दुर्गेशचा विवाह असल्याने घरात लग्नाची जोरदार तयारी सुरु होती. मात्र, नियतीला ते मान्य नव्हते. एकीकडे लग्नाच्या तयारीत लांजेवार कुटुंबीय व्यस्त असतानाच दुर्गेशचा अपघाती मृत्यू झाल्याने लांजेवार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज सकाळी ठाणा पेट्रोल पंप येथे दुर्गेश चे अंतिम संस्कार करण्यात आले.
जवाहरनगर पोलिसांनी अपघाताला कारणीभूत ठरलेला ट्रक व ट्रकचालक ताब्यात घेतला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भिमाजी पाटील करीत आहेत.