

बंगळूरु : पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली अटक झालेल्या एका डॉक्टरने, तिला मारल्यानंतर दुसऱ्या लग्नासाठी किमान ४ ते ५ महिलांशी संपर्क साधल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. डॉ. महेंद्र रेड्डी जी.एस. असे या आरोपीचे नाव आहे. तुझ्यासाठी मी माझ्या बायकोचा खून केला असा थरकाप उडवणारा मेसेज बेंगळुरूतील डॉक्टर रेड्डी याने आपल्या त्वचारोगतज्ज्ञ पत्नी कृथिका रेड्डीच्या हत्येनंतर ४ ते ५ महिलांना पाठवला होता. त्यापैकी एक महिला वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून तिने याआधीच त्याला नकार दिला होता.
बंगळूरु येथील त्वचारोगतज्ज्ञ पत्नी डॉ. कृथिला रेड्डी यांच्या हत्येचा महेंद्र मुख्य आरोपी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने २४ एप्रिल रोजी पत्नी कृथिका (वय २९) हिला भूल देऊन ठार केले. महेंद्रला १४ ऑक्टोबर रोजी उदयपूर जिल्ह्यातील मणीपाल येथून अटक करण्यात आली.
पत्नीच्या मृत्यूनंतर महेंद्रने ज्या महिलांनी पूर्वी त्याला नकार दिला होता, त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधला आणि लग्नाचे नवे प्रस्ताव दिले. त्यातीलच एक वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलेने त्याला अनेक मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर ब्लॉक केले होते. त्यामुळे महेंद्रने तिला थेट 'फोन-पे' या डिजिटल-पेमेंट ॲपद्वारे 'मी तुझ्यासाठी माझ्या पत्नीला मारले' असा संदेश पाठवला.
व्हाईटफिल्डचे पोलीस उपायुक्त के. परशुरामा यांनी 'फोन-पे' ॲपवरून संदेश पाठवल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पोलिसांनी महेंद्रचा मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करून ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत. तपासामध्ये हे संदेश आढळले.
पोलिसांनी या महिलेचा जबाब नोंदवला असून, तिने लग्नापूर्वीच महेंद्रला ब्लॉक केले होते आणि त्याच्या लग्नानंतर ती त्याच्यापासून दूर राहिली होती. महेंद्रने खुनाची कबुली असलेला संदेश पाठवल्यानंतरही, तो केवळ तिच्याशी बोलण्यासाठी खोटे बोलत असावा, असे तिला अटक होईपर्यंत वाटत होते, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने स्पष्ट केले. या महिलेचा गुन्ह्यात कोणताही सहभाग नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
तपासात असंही आढळलं की, महेंद्रने २०२३ पर्यंत मुंबईतील एका महिलेशीही संपर्क ठेवला होता. त्याने तिला लग्नाचा प्रस्ताव दिला आणि काही भेटीगाठीही झाल्या. नंतर त्याने आपल्या वडिलांकडून तिला फोन करवून 'अपघातात आपला मृत्यू झाल्याचे' खोटे सांगितले आणि संपर्क तोडला.
मात्र, सप्टेंबर महिन्यात महेंद्रने तिला पुन्हा फोन केला आणि आपण मेलो नसल्याचे स्पष्ट केले. त्याने तिला सांगितले की, “मी मेलो नाही, माझ्या कुंडलीनुसार माझी पहिली बायको मरणार आहे. आता ती मेलीय, आणि मी तुझ्याशी लग्न करू इच्छितो.”