

COVID-19 In India
देशात कोरोना रुग्णसंख्या वाढतच आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात शुक्रवारी सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ५,३६४ वर पोहोचली. देशात ७६४ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात केरळमधील दोन आणि पंजाब, कर्नाटकातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
केरळमध्ये रुग्णांची संख्या वाढत असून येथे एका दिवसात १९२ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर गुजरातमध्ये १०७, पश्चिम बंगालमध्ये ५८, दिल्लीत ३० आणि महाराष्ट्रात २२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे, केंद्राकडून रुग्णालयांच्या तयारीसाठी मॉक ड्रिल घेतले जात आहे.
दिल्लीत ३० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे येथील सक्रिय रुग्णसंख्या ५९२ वर पोहोचली आहे. १ जानेवारीपासून दिल्लीत कोरोनामुळे सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर गुरुवारपासून येथे एकही रुग्ण दगावलेला नाही.
कोरोना वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्राने सर्व राज्यांना ऑक्सिजन, आयसोलेशन बेड्स, व्हेंटिलेटर आणि आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
सध्याची कोरोनाची तीव्रता कमी आहे. पण विषाणूने स्थानिक आजाराचं रूप घेतल्यास आणि तो बदलत राहिल्यास रुग्णसंख्येत अधूनमधून वाढ होण्याची शक्यता आहे, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे घाबरण्याचे कोणतेही मोठे कारण नसल्याचेही सांगण्यात आले आहे.
सध्याच्या कोरोनामुळे घसा खवखवणे, थकवा, सौम्य स्वरुपाचा खोकला, ताप, स्नायूदुखी, नाक चोंदणे, कमी स्वरुपाचा हायपरथर्मिया, डोकेदुखी, मळमळ आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या आदी लक्षणे दिसून येत आहेत.