

How worried should I be about COVID New Variant
मुंबई : कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी आता या कोरोनाला फक्त ‘ताप’ म्हणायला शिका. त्याला तापाचाच दर्जा द्या. रुग्णालयात येणारा रुग्ण हा सर्दी, ताप आला म्हणून येत आहे. कोरोना म्हणून येत नाही, अशा शब्दांत यूनिसन मेडिकेअर तथा रिसर्च सेंटर मुंबई, संक्रमक रोग विशेषज्ञ डॉ. ईश्वर गिलाडा यांनी पुढारीच्या वाचकांना मोठा दिलासा दिला.
कोरोना म्हटले की पूर्वी लोक लांब पळत. घरातील व्यक्तीलाही वाळीत टाकल्याची परिस्थिती असे. आज मात्र लोकांमध्ये अशा भीतीचे वातावरण नाही आणि कारणही नाही. आता कोरोनाची तीव्रता आणि लक्षणे सौम्य आहेत. हा कोरोना फ्लूसारखाच आहे, असे डॉ. गिलाडा म्हणाले.
भारतात देण्यात आलेली कोरोना प्रतिबंधक लस ही इतर देशांच्या तुलनेत अधिक प्रभावी असल्यामुळे आणि भारतातील नागरिकांची प्रतिकारशक्ती ही इतर देशांच्या तुलनेत चांगली असल्यामुळे यावेळी आपल्याला कोरोनाचा फारसा धोका नाही.
ज्या ओमायक्रॉनमुळे आज रुग्ण वाढत आहेत. त्याच ओमायक्रॉनमुळे भारतीयांची प्रतिकारशक्ती वाढली आहे. तोच विषाणू परत आला म्हणून घाबरण्याचे कारण काय, असा सवाल करत डॉ. गिलाडा म्हणाले, भारतासह जगभर कोरोनाचे व्हेरिएंट बदलत गेले अल्फा, बिटा, डेल्टा, क्रोमा आणि त्यानंतर आलेला ओमायक्रॉन. डेल्टाने देशाचे नुकसान केले. या लाटेत लाखोंना लागण झाली आणि हजारो मृत्युमुखी पडले. सर्वांत शेवटी आलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने आपल्या समाजात रोगप्रतिकारक शक्ती तयार केली.
या विषाणूच्या लाटेत जवळपास सर्वांनाच कोरोना होऊन गेला, लक्षणे कमी असल्याने प्रत्येकाची तपासणी झाली नाही. म्हणजे, या विषाणूच्या संसर्गात कोरोना झाला तरी अनेकांना कळलेदेखील नाही.त्यामुळे ओमायक्रॉन परत आला म्हणून चिंता करावी असे काहीही नाही.
आतापर्यंत कोरोनाचे पाच व्हेरिएंट आले. त्यात डेल्टा हाच भयंकर होता. त्या यापेक्षा भयंकर काही प्रकार कोरोनाचा आला तरच भारताने चिंता करावी. कारण भारतामध्ये कोरोनाची लढण्याची ताकद आधीच तयार झाली आहे. आपल्याकडे सध्या आलेला ओमायक्रॉन हा कोरोनाचा प्रकार जुनाच आणि सौम्य आहे. त्याचा कोणताही धोक नाही. तीव्र स्वरुपाचा नवा प्रकार आला, तरच तो धोका मानता येईल. महत्त्वाचे म्हणजे भारताची 90 टक्के लोकसंख्या कोविशिल्ड लस घेतलेली आहे, प्रतिकारशक्ती मजबूत आहे. कोरोनाची कोणतीही भयंकर साथ उद्भवण्याची शक्यता नाही.
कोरोनासाठी स्वतंत्र किंवा वेगळी विशेष व्यवस्था, सुविधा करण्याची आता गरज राहिलेली नाही. गरज नसताना वेगळी यंत्रणा सज्ज ठेवण्याची आवश्यकता नाही. कोरोना आला म्हणून सर्दी-खोकला झाल्यावर जशी तपासणी करतात तशीच तपासणी केली जात आहे. टेस्ट होतात म्हणून रुग्णसंख्येत वाढ दिसून येत आहेत. कोरोनासाठी स्वतंत्र उपचार पध्दत नाही. त्यामुळे आपण कोरोनाला तापाचा दर्जा द्यावा आणि ताप म्हणूनच या रुग्णांना वागणूक द्यावी, उपचार द्यावेत.
आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला कोरोनाची लागण झाल्यास तीन, चार दिवस काळजी घ्या. इतर व्याधी असलेल्यांना फक्त सांभाळा.अन्यथा घाबरण्याची काहीच गरज नाही. सौम्य कोरोनाचाही धोका, मधुमेह, रक्तदाब, अस्थमा, हृदयविकार असलेल्यांना होतो. आताही जे रुग्ण कोरोना झाला म्हणून मृत्युमुखी पडतात ते कोरोनामुळे नव्हे,तर सहव्याधींमुळे/ कोमॉर्बिलीटीमुळे मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे कोणत्याही कोरोनाच्या साथीत या आधीपासूनचे आजार असलेल्या लोकांची काळजी घ्यावी लागेल.
भारतात आतापर्यंत देण्यात आलेले कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस हे जगात सर्वोच्च दर्जाचे आहेत. सर्वांनीच किमान दोन डोस घेतले आहेत. अनेकांनी बुस्टर डोसदेखील घेतले आहेत. आता कोरोनाचे रुग्ण वाढताना लसीकरण करा म्हणून दवंडी पिटली जात आहे, ती चुकीची आहे. देशात 2021 नंतर अशी कोणतीही लस तयार झालेली नाही आणि अशा लसीकरणाची गरजदेखील नाही.