

Cough Syrup:
नवी दिल्ली: खोकल्यावरील औषधाच्या अतिसेवनामुळे तसेच त्याच्यातील घातक घटकांमुळे लहान मुलांचे मृत्यू आणि गंभीर दुष्परिणाम झाल्याच्या घटना समोर आल्यानंतर केंद्र सरकारने याच्या अनिर्बंध विक्रीवर कडक निर्बंध लादण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे अनेक खोकल्याची औषधे डॉक्टरांच्या वैद्यकीय प्रिस्क्रिप्शनशिवाय मेडिकल दुकानांमध्ये दिली जाणार नाहीत.
या नियमांचे उल्लंघन होऊ नये म्हणून, औषध विक्रेत्यांना प्रत्येक प्रिस्क्रिप्शनचा रेकॉर्ड ठेवावा लागणार आहे. त्याचबरोबर, कफ सिरपच्या उत्पादन आणि गुणवत्ता तपासणीचे नियम अधिक कठोरपणे पाळणे अनिवार्य करण्यात आले आहे.
औषध सल्लागार समितीची मंजुरी
सरकारच्या सर्वोच्च नियामक संस्था असलेल्या औषध सल्लागार समितीने (Drug Consultative Committee) कफ सिरपला त्या शेड्यूलमधून वगळण्याची मंजुरी दिली आहे, ज्या तरतुदी कफ सिरपला परवाना आणि विशेष देखरेख नियमांमधून सूट देत होत्या. म्हणजेच, या निर्णयामुळे कफ सिरप खरेदी करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला आणि प्रिस्क्रिप्शन बंधनकारक असेल.
औषध सल्लागार समितीच्या एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांत भारतातून निर्यात केलेल्या अनेक कफ सिरपमध्ये घातक रसायने (उदा. डाय-एथिलीन ग्लायकोल आणि एथिलीन ग्लायकोल आढळली होती. या घटकांमुळे गांबिया, उझबेकिस्तान आणि कॅमेरूनसह भारतात मध्य प्रदेशातही काही लहान मुलांचे मृत्यू झाले होते. या घटनांच्या पार्श्वभूमीवर, खोकला-सर्दीसारख्या सामान्य आजारांवरही नागरिक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेण्याऐवजी तज्ज्ञांचा सल्ला घेतील, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
नशाखोरी रोखण्याचाही उद्देश
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, "मुलांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे." चुकीच्या औषध सेवनाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. काही लोक कफ सिरपचा वापर नशा करण्यासाठी करत असल्याचे तसेच अनेक पालक डॉक्टरांना विचारल्याशिवाय मुलांना हे सिरप देत असल्याचेही समोर आले आहे. या नव्या नियमांमुळे या दोन्ही समस्यांवर नियंत्रण मिळवता येणार आहे.