

high court on dating app case
बंगळुरू: प्रेमसंबंध संपुष्टात आल्यानंतर परस्पर संमतीने ठेवलेल्या शारीरिक संबंधांना 'भारतीय न्याय संहिता' (BNS) च्या कलम ६९ अंतर्गत गुन्हेगारी स्वरूप देण्याच्या वाढत्या प्रवृत्तीवर कर्नाटक उच्च न्यायालयाने कडक ताशेरे ओढले आहेत. नातेसंबंध बिघडल्यानंतर सहमतीने प्रस्थापित झालेल्या लैंगिक संबंधांना गुन्हेगारी ठरवण्यासाठी 'भारतीय न्याय संहिता' (BNS) च्या कलम ६९ अंतर्गत तक्रारी दाखल करण्याच्या प्रमाणात चिंताजनक असल्याचेही न्यायालयाने डेटिंग ॲप प्रकरणी सुनावणी दरम्यान नमूद केले.
'बार ॲड बेंच'च्या रिपोर्टनुसार, तरुणाची 'बंबल' (Bumble) या डेटिंग अॅपद्वारे एका महिलेशी ओळख झाली होती. त्यांच्यात परस्पर सहमतीने संबंध प्रस्थापित झाले, मात्र नंतर महिलेने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन फसवणूक केल्याचा आरोप करत कलम ६९ अंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणात आरोपी सध्या तुरुंगात आहे. त्याने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना यांच्यासमोर सुनावणी झाली.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने 'भारतीय न्याय संहिता' (BNS) च्या कलम ६९ अंतर्गत दाखल तक्रारीच्या अंमलबजावणीवर आणि वाढत्या गैरवापरावर कडक ताशेरे ओढले. प्राथमिकदृष्ट्या हे संबंध परस्पर सहमतीने असल्याचे दिसत असल्याने न्यायालयाने आरोपीविरुद्धच्या तपासाला स्थगिती दिली. तसेच या प्रकरणात अटकेची गरज नव्हती आणि सर्व कृत्ये सहमतीने झाली होती, तिथे याचिकाकर्ता कारावास भोगत आहे," असे म्हणत न्यायालयाने त्याची तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले.
'भारतीय न्याय संहिता' (BNS) च्या ६९ कलमांतर्गत १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद असल्याने, गुन्हा नोंदवताच राज्य यंत्रणा आरोपीला तात्काळ ताब्यात घेत आहे. याकडे लक्ष वेधताना न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना यांनी स्पष्ट केले की, "दोन-तीन वर्षे सहमतीने संबंध ठेवले जातात आणि नाते तुटल्यावर गुन्हा दाखल होतो, परिणामी पुरुष तुरुंगात जातो. अशा प्रकरणांची संख्या न्यायालयात वाढत आहे."
सुनावणीदरम्यान एक रंजक प्रसंग घडला. आरोपीच्या वकिलांनी सांगितले की, तक्रारदार महिलेने एक कविता लिहिली आहे, ज्यातून हे संबंध 'कॅज्युअल' असल्याचे स्पष्ट होते. यावर सरकारी वकिलांनी सांगितले की, त्या कवितेत लग्नाच्या आश्वासनाचाही उल्लेख आहे. न्यायमूर्तींनी विचारले, "कवितेत ज्याच्याबद्दल लिहिले आहे, तो आरोपीच आहे का?" त्यावर वकिलांनी उत्तर दिले, "हो, मीच त्या कवितेसाठी प्रेरणा आहे." हे ऐकून न्यायमूर्तींनी गंमतीने म्हटले, "हे तर नक्कीच मनोरंजक आहे."