

Shashi Tharoor on Congress's Laxmanresha remark
नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी गुरुवारी स्पष्ट केले की, त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात केंद्र सरकारचे समर्थन भारतीय नागरिक या नात्याने केले होते, पक्षाचे प्रवक्ते म्हणून नव्हे.
काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या थरूर यांच्यावर ‘लक्ष्मणरेषा ओलांडली’ या शब्दात टीका केली होती. त्याला थरूर यांनी उत्तर दिले आहे.
थरूर म्हणाले, "या काळात, संघर्षाच्या वेळी, मी भारतीय म्हणून बोललो. मी कधीच दुसऱ्याच्यावतीने बोलल्याचा दावा केला नाही. मी पक्षाचा प्रवक्ता नाही. मी सरकारचा प्रवक्ता नाही. मी जे काही बोललो, ते माझे वैयक्तिक मत होते.
तुम्हाला त्याच्याशी सहमत किंवा असहमत होता येईल, त्याची जबाबदारी मी वैयक्तिकरित्या घेतो, आणि ते मला मान्य आहे."
थरूर यांनी असेही सांगितले की, हे त्यांचे वैयक्तिक मत असून, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या बाजूने एकमत दाखवणे महत्त्वाचे होते.
ते म्हणाले, “मी अगदी स्पष्टपणे सांगितले आहे की हे माझे वैयक्तिक मत आहे. हे राष्ट्रीय चर्चेत माझे योगदान होते.
या वेळी आपण सर्वांनी झेंड्याभोवती एकत्र यायला हवे होते, विशेषतः आंतरराष्ट्रीय स्तरावर. अमेरिका, युरोप आणि मध्यपूर्वेत आपल्या दृष्टिकोनाचा आवाज फारसा ऐकू येत नव्हता."
जेव्हा थरूर यांना विचारण्यात आले की पक्षातील काही वरिष्ठ नेते त्यांच्या वक्तव्यांवर नाराज असल्याचे सांगितले जात आहे, तेव्हा त्यांनी उत्तर दिले, “लोकांना माझ्या मताशी असहमत होण्याचा पूर्ण अधिकार आहे.
मला पक्षाकडून कोणतीही अधिकृत सूचना मिळालेली नाही; मी फक्त माध्यमांमधून हे ऐकत आहे.”
काँग्रेस कार्यकारिणीने बुधवारी पक्षाच्या सदस्यांना पक्षशिस्त पाळण्याचा आणि वैयक्तिक मते जाहीर न करण्याचा इशारा दिला होता.
एका वरिष्ठ नेत्याने पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले होते की, "आपण एक लोकशाही पक्ष आहोत आणि लोक सतत आपली मते व्यक्त करतात, पण या वेळेस थरूर यांनी लक्ष्मणरेषा ओलांडली आहे."
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनीही थरूर यांच्या वक्तव्यावर माध्यमांशी बोलताना म्हटले होते की, "ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. जेव्हा श्री. थरूर बोलतात, तेव्हा ते त्यांचे वैयक्तिक मत असते, पक्षाची अधिकृत भूमिका नसते."
दरम्यान, शशी थरूर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही टीका केली होती. ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान संघर्षात मध्यस्थी करून शांतता प्रस्थापित केल्याचा दावा केला होता.
त्यावरून थरूर यांनी टीका केली होती. थरूर हे तिरूअनंतपुरमचे काँग्रेसचे खासदार असून आंतरराष्ट्रीय, परराष्ट्र संबंधांचे जाणकार आहेत.