

Turkish Firm Celebi Aviation operating 9 airports in India
नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांत भारत आणि पाकिस्तानदरम्यान शस्त्रसंधीवर सहमती झाली असली तरी, तुर्कीएविरोधातील नाराजी अजूनही कायम आहे. त्यातच आता तुर्कीएच्या एका कंपनीच्या हातात भारतातील विमानतळांची सुरक्षिततेची जबाबदारी असल्याचे समोर आले आहे.
ही गंभीर बाब असल्याने भारतीय विमानतळांवर महत्त्वाच्या सेवा पुरवणारी तुर्की कंपनी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
सेलेबी एव्हिएशन होल्डिंग असे या कंपनीचे ऩाव आहे. ही तुर्की कंपनी असून ती विमानतळांवरील एकत्रित ग्राउंड हँडलिंग सेवांमध्ये माहीर आहे.
1958 मध्ये तुर्कीतील पहिली खाजगी ग्राउंड हँडलिंग कंपनी म्हणून सुरू ही कंपनी सुरू झाली होती. आता ही कंपनी जागतिक स्तरावरील सेवा पुरवणारी कंपनी बनली आहे.
15000 हून अधिक कर्मचाऱ्यांच्या मदतीने सेलेबी जगभरातील तीन खंडांमधील सहा देशांमध्ये 70 विमानतळांवर सेवा देत आहे.
सेलेबी एव्हिएशनने भारतात जागतिक दर्जाच्या ग्राउंड हँडलिंग सेवा देण्याच्या उद्देशाने प्रवेश केला.
भारतात येताच त्यांनी दोन स्वतंत्र संस्था स्थापन केल्या:
1) सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया – ग्राउंड हँडलिंग संचालनासाठी
2) सेलेबी दिल्ली कार्गो टर्मिनल मॅनेजमेंट इंडिया – दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरील मालवाहतूक सेवा हाताळण्यासाठी.
गेल्या दशकात भारतातील सेलेबीचे कार्यक्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आज कंपनी दिल्ली, बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद, गोवा, कोचीन आणि कन्नूरसह नऊ प्रमुख भारतीय विमानतळांवर कार्यरत आहे.
सेलेबी भारतात दरवर्षी 58000 हून अधिक उड्डाणे आणि 5.4 लाख टनांहून अधिक मालवाहतूक हाताळते, यासाठी त्यांच्याकडे सुमारे 7800 कर्मचारी आहेत.
सेलेबी एव्हिएशन भारतीय विमानतळांवर काही अत्यंत संवेदनशील आणि उच्च-सुरक्षा सेवा पुरवते. या सेवांमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:
रॅम्प हँडलिंग सेवा – विमानांना भूमीवर योग्य मार्गदर्शन देणे
लोड कंट्रोल व फ्लाइट ऑपरेशन्स – विमानाचा समतोल योग्य राखण्यासाठी आवश्यक नियोजन
ब्रिज ऑपरेशन्स – प्रवाशांना विमानात प्रवेश मिळवून देणाऱ्या ब्रिजेसचे संचालन
प्रवासी, मालवाहतूक व पोस्टल सेवा, तसेच गोदाम व्यवस्थापन – हे क्षेत्र अत्यंत सुरक्षात्मक आहे, कारण येथे संवेदनशील वस्तूंची हालचाल व साठवणूक केली जाते
जनरल एव्हिएशन, प्रीमीयम लाऊंज सेवा – यात खाजगी किंवा व्हीआयपी विमानांचे संचालन येते
भारताच्या दृष्टीने अशा अत्यावश्यक सेवा एका परकीय, आणि सध्या वादग्रस्त देशाशी संबंधित कंपनीकडे असल्याने ही बाब चिंतेची ठरू शकते.
अलीकडील भारत-पाकिस्तान संघर्षात तुर्कीएने पाकिस्तानला पाठिंबा दिल्याने भारतात तुर्कीएविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सोशल मीडियावर अनेक भारतीयांनी तुर्कीएला पर्यटनासाठी भेट न देण्याचा इशारा दिला असून भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर तुर्कीएने पाकिस्तानला ड्रोन पुरवल्याच्या वृत्तांमुळे हा संताप अधिक वाढला आहे.
ऑपरेशन सिंदूर 22 एप्रिल रोजीच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात केले गेले होते, ज्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता.