पंतप्रधानांच्या कन्याकुमारी दौऱ्याविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

पंतप्रधानांच्या कन्याकुमारी दौऱ्याविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा:  लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कन्याकुमारीतील प्रस्तावित ध्यानधारणा दौऱ्याविरुद्ध काँग्रेसने बुधवारी (दि.२९) केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

काँग्रेसचे नेते अभिषेक मनू सिंघवी, सरचिटणीस रणदीप सुरजेवाला व नासीर हुसैन यांनी निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन पंतप्रधानांच्या दौऱ्याविषयी तक्रार दाखल केली. या तक्रारीबाबत माहिती देताना सिंघवी म्हणाले की, निवडणूक प्रचारास ४८ तासांची बंदी असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीला जात आहेत. त्यांच्या ध्यानधारणेमुळे आचारसंहितेचे उल्लंघन होणार आहे. त्यामुळे पंतप्रधानांना हा दौरा रोखावा, अशी मागणी काँग्रेसने आयोगाकडे केली आहे.

 मोदींच्या कन्याकुमारी दौऱ्याविरोधात काँग्रेसची तक्रार का?

  • निवडणूक प्रचारास ४८ तासांची बंदी असताना मोदी कन्याकुमारीला जात आहेत.
  • त्यांच्या ध्यानधारणेमुळे आचारसंहितेचे उल्लंघन होणार आहे.
  • त्यामुळे पंतप्रधानांना हा दौरा रोखावा,
  • काँग्रेसची बुधवारी (दि.२९) केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार

मोदी ३० मे ते १ जूनदरम्यान कन्याकुमारीला जाणार

लोकसभा निवडणूकीच्या अंतिम टप्प्याचा प्रचार संपताच पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्यानधारणेसाठी कन्याकुमारीला जाणार आहेत. गेल्या दीड महिन्यापासून लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर सभा, रोड शोच्या माध्यमातून मोदींचा जोरदार प्रचार सुरु आहे. प्रचाराचा हा क्षीण भागविण्यासाठी मोदी हे ३० मे ते १ जूनदरम्यान ध्यानधारणा करण्याच्या उद्देशाने कन्याकुमारीला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या दौऱ्यात पंतप्रधान मोदी हे रॉक मेमोरियलला भेट देतील. स्वामी विवेकानंद यांनी ध्यानधारणा केलेल्या पावनस्थळावर मोदी ध्यानधारणा करणार आहेत. हा दौरा आध्यात्मिक असून त्यात कुठलेही राजकीय कार्यक्रम होणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. मोदी यापूर्वी २०१९ च्या निवडणुकीनंतर केदारनाथला गेले होते. २०१४ मध्ये ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या प्रतापगडला गेले होते. दुसरीकडे, काँग्रेस नेते राहुल गांधीही लोकसभा प्रचार संपल्यावर विपश्यना करण्यासाठी दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news