मोदी सरकारच्या नव्या टर्ममध्ये समान नागरी कायदा

मोदी सरकारच्या नव्या टर्ममध्ये समान नागरी कायदा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भाजप तिसर्‍यांदा सत्तेत आल्यावर देशात समान नागरी कायदा आणि 'एक देश एक निवडणूक' या धोरणाची अंमलबजावणी करेल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भाजपच पुन्हा सत्तेवर येणार असल्याचा दावा केला.

अमित शहा म्हणाले, देशाची घटना तयार करणार्‍यांनी दिलेली ही जबाबदारी असून आम्ही, या देशाची संसद आणि विधानमंडळे यांना ती पार पाडावयाची आहे. घटना समितीनेच त्याबाबत त्यावेळी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहे. त्यावेळी के. एम. मुन्शी, डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सेक्युलर देशात धर्मावर आधारित कायदे नकोत, तर समान नागरी कायदा हवा, असे म्हटले होते. भाजपने उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा तयार करण्याबाबत घेतलेला निर्णय त्या दिशेने पाऊल आहे.

अमित शहा पुढे म्हणाले, समान नागरी कायदा ही एक सामाजिक, कायदेशीर आणि धार्मिक अशी क्रांतिकारक सुधारणा आहे. उत्तराखंड सरकारने केलेल्या कायद्याची सामाजिक आणि कायदेशीर स्तरावर पडताळणी केली जावी. त्यात धार्मिक प्रमुखांशीही चर्चा व्हावी. या विषयावर सांगोपांग चर्चा व्हायला हवी, असे सांगून शहा म्हणाले, या मंथनातूनच पुढे देशाचे कायदेमंडळ याबाबत गांभीर्याने विचार करून कायदा अंमलात आणेल. त्यामुळेच भाजपने आपल्या संकल्प पत्रात समान नागरी कायदा लागू करू, असे वचन दिल्याचे शहा यांनी निदर्शनास आणून दिले. सध्या उन्हाळ्यात होणार्‍या निवडणुका हिवाळ्यात घेण्याबाबतच्या शक्यतेवर अमित शहा म्हणाले, त्याचा नक्की विचार केला जाईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news