Cockroach Janata Party
नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलेल्या एका वादग्रस्त टिप्पणीमुळे देशातील तरुण वर्गात संतापाची लाट उसळली आहे. या विधानाचा निषेध म्हणून सोशल मीडियावर सुरू झालेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ या मोहिमेला आता कायदेशीर आणि व्यावसायिक वळण लागले आहे. केंद्र सरकारच्या आदेशानंतर या मोहिमेचे मुख्य 'एक्स' खाते निलंबित करण्यात आले असून, दुसरीकडे या नावाचा ट्रेडमार्क मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे.
गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणांच्या वाढत्या सक्रियतेवर भाष्य केले होते. "बेरोजगार तरुण माध्यम, सोशल मीडिया आणि आरटीआयच्या माध्यमातून कार्यकर्ते बनत आहेत," असे म्हणत त्यांनी त्यांची तुलना 'झुरळां'शी केली होती. हे विधान सोशल मीडियावर व्हायरल होताच तरुणांनी संताप व्यक्त केला. आम्ही व्यवस्थेला प्रश्न विचारणारे 'झुरळ' आहोत, असे म्हणत नेटिझन्सनी #CockroachJanataParty हा हॅशटॅग ट्रेंड करण्यास सुरुवात केली. वाढता वाद पाहून सरन्यायाधीशांनी नंतर स्पष्टीकरण दिले की, "माझी टिप्पणी ही बनावट पदव्यांच्या आधारे विविध व्यवसायांत घुसणाऱ्या लोकांच्या संदर्भात होती."
आम आदमी पार्टीचे माजी राजकीय रणनीतीकार अभिजित दिपके यांनी या आंदोलनाला अधिकृत स्वरूप देत 'कॉकरोच जनता पार्टी' नावाने सोशल मीडिया पेजेस सुरू केली. अवघ्या काही दिवसांतच या पेजचे एक्स आणि इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स झाले. मात्र, हे वाढते वादळ रोखण्यासाठी केंद्र सरकारने कायदेशीर पावले उचलत या मोहिमेचे 'एक्स' हँडल अधिकृतपणे निलंबित करण्यात आले आहे.
या आंदोलनाची वाढती लोकप्रियता आणि डिजिटल ताकद पाहता, या नावाचा व्यावसायिक किंवा राजकीय वापर करण्यासाठी पडद्यामागे हालचाली सुरू झाल्या आहेत. ट्रेडमार्क रजिस्ट्रीच्या सार्वजनिक शोध पोर्टलवरील माहितीनुसार, “COCKROACH JANTA PARTY” या शब्दचिन्हासाठी दोन स्वतंत्र ट्रेडमार्क अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
पहिला अर्ज: अर्ज क्रमांक ७७३७९३७ अंतर्गत अझीम आदमभाई जाम यांनी दाखल केला आहे.
दुसरा अर्ज: अर्ज क्रमांक ७७४१४८१ अंतर्गत अखंड स्वरूप यांनी दाखल केला आहे.
विशेष म्हणजे, हे दोन्ही अर्ज प्राथमिक तपासणीत पात्र ठरले असून सध्या त्यांची स्थिती “Formalities Chk Pass” अशी दाखवत आहे. सरकारकडून कॉकरोच जनता पार्टीचं अकाऊंट थांबवल्या नंतर ही डिजिटल दडपशाही असल्याचा आरोप करत तरुणांनी या कारवाईचा निषेध केला आहे, तर दुसरीकडे कायदेशीर रित्या हे नाव स्वतःच्या नावावर करण्यासाठी सुरू झालेल्या या नव्या लढाईमुळे या प्रकरणाला आता एक वेगळेच वळण मिळाले आहे.