

Karnataka Bhavan clash Delhi |
नवी दिल्ली : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यातील वादाचे पडदास राजधानी दिल्लीतील कर्नाटक भवनात उमटले. या दोन्ही नेत्यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
डी. के. शिवकुमार यांचे विशेष अधिकारी एच. अंजनय्या यांनी सी. मोहन कुमार यांच्यावर बूटाने मारहाण केल्याचा आरोप करत औपचारिक तक्रार दाखल केली आहे.
दिल्लीतील कर्नाटका भवन, जेथे कर्नाटक सरकारचे प्रतिनिधी अधिकारी आणि पाहुणे थांबतात, तिथे 22 जुलै रोजी ही घटना घडली.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे विशेष अधिकारी एच. अंजनय्या (H. Anjaneya) हे Group-B स्तराचे सरकारी अधिकारी आहेत. ते आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे विशेष अधिकारी आणि Assistant Resident Commissioner सी. मोहन कुमार (C. Mohan Kumar) जे कर्नाटक भवनात कार्यरत आहेत त्यांच्यात हा वाद झाला.
शाब्दिक वाद सुरू झाला आणि तो लवकरच हाणामारीपर्यंत पोहोचला. अंजनय्या यांच्या तक्रारीनुसार, मोहन कुमार यांनी त्यांना बूटाने मारले. ही घटना कार्यालयाच्या कक्षात, इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घडली, असेही तक्रारीत म्हटले आहे.
अंजनय्या यांनी 22 जुलै 2025 रोजी इमकोंगला जमीर यांच्याकडे औपचारिक तक्रार दाखल केली. तक्रारीत अंजनय्या यांनी नमूद केले होते की, "ही घटना माझ्या सन्मानाला धक्का पोहोचवणारी आहे. मला धोका वाटत आहे.
जर काही अपघात झाला, तर त्यास सी. मोहन कुमार जबाबदार असतील." त्यांनी हेही नमूद केलं की मोहन कुमार यापूर्वीही एम. एम. जोशी नावाच्या अधिकाऱ्याशीसोबतही गैरवर्तन केलं होतं.
अंजनय्या यांनी निवासी आयुक्त इमकोंगला जमीर यांच्याकडे तक्रार दाखल करत सी. मोहन कुमार यांच्यावर गुन्हेगारी कारवाई करण्याची मागणी केली आहे.
"कार्यालयाच्या कक्षात, सर्वांच्या उपस्थितीत मोहन कुमार यांनी मला बूटाने मारण्याची धमकी दिली आणि प्रत्यक्ष मारहाण केली. माझ्या सन्मानाला आणि प्रतिष्ठेला ठेच पोहोचली आहे. माझ्यावर झालेल्या हल्ल्याचा तपास करून न्याय द्यावा," — अशी विनंती अंजनय्या यांनी आपल्या तक्रारीत केली आहे.
सी. मोहन कुमार हे कामात सतत अडथळा निर्माण करीत असल्याचेही अंजनय्या यांनी तक्रारीत नमूद केले आहे. तक्रारीत म्हटले आहे की, कुमार यांच्याकडे पूर्वीही MM जोशी यांना मारहाण केल्याचा इतिहास आहे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांप्रती त्यांचे वर्तन उद्धटपणे होते.
याआधीही अंजनय्या यांनी अशा वादांपासून दूर राहण्यासाठी आपले स्थानांतर मागितले होते, असेही तक्रारीत नमूद केले आहे.
निवासी आयुक्त इमकोंगला जमीर यांनी तक्रार मिळाल्याचे मान्य करत सांगितले की, "22 जुलै रोजीची तक्रार प्राप्त झाली आहे. सर्व प्रक्रियेचे पालन करून चौकशी केली जाईल."
मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे दोघेही काँग्रेसचे वरिष्ठ नेते असून कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या वाटाघाटींवरून तणाव असल्याची चर्चा आहे. दोघांच्या गटांमध्ये निर्माण झालेल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याचे मानले जात आहे.
त्यांच्या निकटवर्तीयांमध्ये असा वाद होणे, हे सत्तेतील अंतर्गत संघर्षाची प्रचिती देणारे आहे. काही दिवसांपूर्वीच दोघेही नेते दिल्लीला भेट देण्यासाठी एकत्र गेले होते, ज्यामुळे या घटनेला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
ही घटना केवळ दोन व्यक्तींमधील वाद नसून, ती कर्नाटकच्या सत्ताधारी गटांतील अंतर्गत तणावाचे लक्षण मानली जात आहे.
शासनातील शिस्तभंग, वैयक्तिक प्रतिष्ठा आणि सुरक्षितता, तसेच राजकीय खेळी — हे सगळे घटक या प्रकरणात गुंतलेले आहेत. यावर काय कारवाई होते, यावरून काँग्रेस नेतृत्वाची अंतर्गत व्यवस्था आणि शिस्त काय आहे, हे दिसून येईल.