India China Talks
एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धमक्या सुरु असताना दुसरीकडे चीनने भारताकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे. चीनने भारताच्या तीन प्रमुख चिंता दूर केल्या आहेत. चीनने भारताला खते, दुर्मिळ अर्थ मॅक्नेट्स/मिनरल्स तसेच टनेल बोरिंग मशीनच्या निर्यातीवरील निर्बंध उठवले आहेत.
या प्रश्नी गेल्या जुलैमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री वांग यी यांची भेट घेतली होती. चीन दौऱ्यादरम्यान एस जयशंकर यांनी भारताच्या तीन समस्यांबाबत चर्चा केली होती.
एएनआयने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, वांग यी यांनी एस जयशंकर यांना आश्वासन दिले की चीन भारताची खतांती गरज, दुर्मिळ अर्थ मॅग्नेट्स आणि टनेल बोरिंग मशीन या तीन प्रमुख अडचणी दूर करेल.
चीनचे परराष्ट्र मंत्री दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी सोमवारी भारतात दाखल झाले. त्यांनी भारत दौऱ्यादरम्यान, भारत आणि चीनच्या त्यांच्या राजनैतिक संबंधांना ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने द्विपक्षीय संबंध कायम ठेवण्यावर सहमती दर्शवली. उभय नेत्यांच्या द्विपक्षीय चर्चेत बदलत असलेली जागतिक परिस्थिती, मुक्त व्यापारासमोरील आव्हाने आणि भारत आणि चीन ह्या प्रमुख शक्ती मिळून कसे काम करू शकतात?, विकसनशील देशांसाठी ते एक उदाहरण कसे ठरू शकतात? अशा विविध विषयांवर चर्चा झाली, असे वृत्त शिन्हुआ न्यूजने दिले आहे.
रब्बी हंगामात अचानक खतांच्या पुरवठ्यावर निर्बंध लागू केल्याने डाय-अमोनियम फॉस्फेटच्या उपलब्धतेवर थेट परिणाम झाला असल्याचे भारताने चीनच्या निदर्शनास आणून दिले होते. तसेच चीनने भारतातील प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी गरजेच्या असलेल्या टनेल बोरिंग मशीन्सची निर्यात रोखली होती. यात विदेशी कंपन्यांनी चीनमध्ये उत्पादन घेतलेल्या मशीन्सचा समावेश होता.
दुर्मिळ अर्थ मॅग्नेट्स आणि मिनरल्सवर चीनने लादलेल्या निर्बंधांमुळे ऑटो आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांकडून गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली होती. ज्यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. दोन्ही देशांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्यादृष्टीकोनातून हे निर्णय घेण्यात आले होते.
पण आता चीनने भारताला खते, अर्थ मॅग्नेट्स आणि टनेल बोरिंग मशीनचा पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे.