

Russian President Vladimir Putin called Prime Minister Narendra Modi
नवी दिल्ली: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत फोनवरून चर्चा केली. यामध्ये पुतिन यांनी अलास्कामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या भेटीची आणि चर्चेची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली. दरम्यान, भारताने युक्रेन संघर्षाच्या शांततापूर्ण तोडग्याचे सातत्याने आवाहन केले आहे आणि या संदर्भात सर्व प्रयत्नांना पाठिंबा दिला आहे. येणाऱ्या काळात आमच्या सततच्या देवाणघेवाणीची मी अपेक्षा करतो, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
आठवडाभरापूर्वीही झाली होती चर्चा
काही दिवसांपूर्वीही पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांनी युक्रेन मुद्द्यावर आणि भारत-रशियाच्या मजबूत संबंधांवर सविस्तर चर्चा केली होती. त्यादरम्यान, दोन्ही नेत्यांनी भारत आणि रशियामधील मैत्री आणखी मजबूत करण्याचे आश्वासन दिले. पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना या वर्षी भारत भेटीचे निमंत्रणही दिले आहे. अमेरिकेसोबतच्या संबंधांमधील तणावाच्या पार्श्वभुमीवर भारत आणि रशियामधील चर्चेची ही मालिका सुरू होत आहे. भारत- अमेरिका संबंधांमधील तणावामुळे भारत आणि रशिया जवळ येत असल्याचे मानले जाते.