

Chhattisgarh Sukma IED blast |
सुकमा : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सोमवारी नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडी स्फोटात अतिरिक्त पोलिस अधीक्षक आकाश राव गिरपुंजे शहीद झाले. अन्य दोन अधिकारी जखमी झाले आहेत. कोंटा-एराबोरा रस्त्यावर दोंड्राजवळ हा स्फोट झाला. सीपीआय (एम) ने १० जून रोजी भारत बंदचे आवाहन केले होते, त्यामुळे नक्षलवादी घटना टाळण्यासाठी गिरीपुंजे पायी गस्त घालत असताना हा अपघात झाला, असे बस्तरचे आयजी सुंदरराज पी यांनी सांगितले.
१० जून रोजी भारत बंदच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारची नक्षलवादी घटना टाळण्यासाठी एएसपी आकाश राव गिरीपुंजे परिसरात पायी गस्त घालत होते. त्याचवेळी सुकमा येथे नक्षलवाद्यांनी कंत्राटदाराच्या जेसीबी मशीनला आग लावल्याची माहिती समजली. त्यानंतर गिरपुंजे आणि इतर अधिकारी घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी गेले होते. या दरम्यान, नक्षलवाद्यांनी लपवून ठेवलेल्या प्रेशर आयईडी स्फोटकांचा ते बळी ठरले. स्फोटात आकाश राव शहीद झाले. एसडीओपी भानू प्रताप चंद्रकर आणि टीआय सोनल ग्वाल गंभीर जखमी झाले. त्यांना सुकमा आरोग्य केंद्रातील प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारांसाठी रायपूर येथे पाठवण्यात आले.
ही घटना दोन सीआरपीएफ छावण्यांदरम्यान घडली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक आकाश राव गिरपुंजे शहीद झाल्याची बातमी कळताच त्यांच्या निवासस्थानी कुटुंबातील सदस्यांची गर्दी केली. मोठ्या संख्येने लोक त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. घटनेची माहिती मिळताच, रायपूरचे एसएसपी डॉ. लाल उमेद सिंह हे देखील कुटुंबातील सदस्यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले.