

नवी दिल्ली : कोरोना आणि निपाहसारख्या प्राणघातक विषाणूंविरुद्धच्या लढाईदरम्यान, भारताने अशा एका घातक विषाणूवर उपाय शोधला आहे, ज्याबद्दल कोरोनाप्रमाणेच लोकांना खूप कमी माहिती आहे, परंतु तो आतापर्यंतच्या सर्वात प्राणघातक संसर्गांपैकी एक आहे. 'चांडीपुरा' या विषाणूमुळे भारतातील ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये आतापर्यंत सर्वाधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. १९६५ मध्ये महाराष्ट्रात आढळलेल्या या विषाणूमुळे अनेक राज्यांमध्ये हजारो लहान मुलांचा बळी गेला होता. सुमारे ६० वर्षे जुन्या या प्राणघातक आजारावर आता औषधाचा शोध लावला आहे.
भारतीय शास्त्रज्ञांनी चांडीपुरा विषाणूवर औषध शोधले आहे, ज्यामुळे रुग्णाच्या जीवाला असलेला धोका कमी केला जाऊ शकतो. चांडीपुरा विषाणू हा एक रॅब्डोव्हायरस आहे, ज्याचा शोध सर्वप्रथम १९६५ मध्ये महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील चांडीपुरा गावात लागला होता. त्यामुळे त्याचे नाव चांडीपुरा ठेवण्यात आले. हा विषाणू वाळूमाशीच्या (Sandfly) चाव्याव्दारे पसरतो आणि मुलांमध्ये वेगाने मेंदूवर परिणाम करणाऱ्या एन्सेफलायटीसचे कारण बनतो, ज्याला सामान्य भाषेत मेंदूचा ताप म्हणतात. पाच ते १५ वर्षे वयोगटातील मुलांना तो सर्वाधिक लक्ष्य करतो. ताप, उलट्या, बेशुद्धी यांसारखी लक्षणे दिसल्यानंतर २४ ते ४८ तासांच्या आत रुग्णाचा मृत्यू होतो.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) शास्त्रज्ञांच्या मते, हा विषाणू अनेक वर्षांपासून भारतात 'सायलेंट किलर' बनला आहे. त्याविरुद्ध संभाव्य अँटीव्हायरल उपचारांचा शोध आता पूर्ण झाला आहे. ICMR च्या पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (NIV) त्यांच्या सेल आणि ॲनिमल मॉडेल प्रयोगांमध्ये 'फेविपिराविर' नावाचे औषध शोधले आहे. या घातक विषाणूची वाढ रोखण्यास ते सक्षम असल्याचे आढळले आहे. भारतात या प्राणघातक विषाणूसाठी एखादे औषध प्रभावी असल्याची वैज्ञानिकदृष्ट्या पुष्टी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
वर्ष २०२४ मध्ये गुजरातमध्ये चांडीपुरा विषाणूचा प्रादुर्भाव दिसून आला, जो गेल्या २० वर्षांतील सर्वात मोठा होता. यादरम्यान, जून ते ऑगस्ट २०२४ या काळात गुजरातसह अनेक राज्यांमध्ये ८२ लोकांचा मृत्यू झाला, तर २४५ हून अधिक लोकांना याची लागण झाली. शास्त्रज्ञांच्या मते, आता फेविपिराविर औषधाची मानवी चाचणी लवकरच सुरू केली जाऊ शकते.
२००३ ते २००४ दरम्यान, या प्रादुर्भावात आंध्र प्रदेशात ३२९ लोकांना लागण झाली, ज्यापैकी १८३ लोकांचा मृत्यू झाला. तर महाराष्ट्रात ११४ आणि गुजरातमध्ये २४ लोकांचा मृत्यू झाला. २००४ ते २०११ या काळात गुजरातमध्ये ३१ लोकांचा मृत्यू झाला, तर १०० हून अधिक लोकांना याची लागण झाली. २००९ ते २०११ दरम्यान इतर राज्यांमध्ये १६ मृत्यू झाले.
महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशातील आदिवासी भाग, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणाचे सीमावर्ती भाग, ओडिशा, बिहार आणि झारखंड व्यतिरिक्त उत्तर प्रदेशाचा पूर्व भाग 'ॲक्यूट एन्सेफलायटीस सिंड्रोम (AES) बेल्ट' म्हणून ओळखला जातो, जिथे दरवर्षी मुलांमध्ये मेंदूच्या तापाची प्रकरणे आढळतात.