पुढारी ऑनलाईन डेस्क : झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन ३० ऑगस्ट रोजी रांची येथे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी त्यांच्या अधिकृत एक्स खात्यावर ही माहिती दिली. चंपाई सोरेन यांनी सोमवारी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती.
चंपाई सोरेन सोमवारी नवी दिल्लीत पोहोचले. तेथे त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. गेल्या मंगळवारपासून त्यांचा हा दुसरा दिल्ली दौरा होता. गेल्या दिल्ली दौऱ्यात त्यांनी पक्ष नेतृत्वावर गंभीर आरोप केले होते. ते नवीन पक्ष काढणार असल्याची चर्चा होती. तत्पूर्वी, दिल्लीला पोहोचल्यावर चंपाई यांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे पक्ष नेतृत्वावर अपमानित केल्याचा आरोप केला होता. पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, सततच्या अपमानास्पद वागणुकीमुळे भावूक झाल्यानंतर मी राजकारणात नवा पर्याय स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीपर्यंतच्या प्रवासासाठी माझ्यासाठी पर्याय खुले आहेत. अपमानमुळे मला पर्यायी मार्ग शोधावा लागला. आजपासून माझ्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू होणार आहे, असे त्यांनी म्हटले होते.