नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा-
महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीत २४ जागांवर मुस्लिम उमेदवारांची घोषणा करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हुसैन दलवाई यांनी केली. मुस्लिम मतदारांची टक्केवारी जास्त असलेल्या विधानसभा मतदारसंघात काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने मुस्लिम उमेदवार द्यावेत असे ते म्हणाले. यासाठी त्यांनी टक्केवारी निहाय मतदारसंघाचा अहवाल तयार केला आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मुस्लिम मतदारांनी मविआला मतदान केले. मात्र मविआने एकही मुस्लिम उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे आता उमेदवार द्यावेत असे ते म्हणाले. महाराष्ट्रातील मुस्लिमांची संख्या साडेअकरा टक्के आहे, त्यानुसार मुस्लिमांना ३२ विधानसभांची उमेदवारी मिळाली पाहिजे. मात्र असे होऊ शकत नाही. म्हणून आम्ही अभ्यास करुन एक अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार मुस्लिम मतदारांची संख्या जास्त असलेल्या २४ जागांवर उमेदवारी देता येईल, असे ते म्हणाले.
त्यांच्या अहवालानुसार मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात सर्वात जास्त ७८.४ टक्के मुस्लिम मतदार आहेत. तर मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर ५३ टक्के, भिवंडी पूर्व ५१ टक्के, मुंबादेवी ५०.९ टक्के, भिवंडी पश्चिम ४९.५ टक्के मुस्लिम मतदार असल्याचा दावा दलवाई यांच्या अहवालात आहे. यासह इतर विभागातील मुस्लीम बहुल ५२ विधानसभा मतदारसंघांचा या अहवालात समावेश त्यांनी केला आहे.