

chainsaw horror inside andhra school class 10 girl fights for life after man cuts her face over rejected love proposal
तिरुपती : पुढारी ऑनलाईन आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमाला नकार दिल्याच्या रागातून एका तरुणाने दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर वर्गात घुसून झाडे कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक करवतीने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना अनंतपूर जिल्ह्यातील राप्ताडू मंडल मुख्यालयातील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण इलेक्ट्रिक करवत घेऊन जिल्हा परिषद हायस्कूलमधील दहावीच्या वर्गात घुसला. त्याने गोपिका नावाच्या विद्यार्थिनीवर अचानक हल्ला चढवला. वर्गातील इतर विद्यार्थी भयभीत होऊन हा प्रकार पाहत असतानाच आरोपीने करवतीने गोपिकाच्या चेहऱ्यावर गंभीर वार केले. तसेच तिच्या डोक्यावर आणि पाठीवरही गंभीर जखमा केल्या.
दरम्यान, गोपिकाला वाचवण्यासाठी आणि आरोपीला रोखण्यासाठी पुढे आलेली लक्ष्मी नावाची दुसरी विद्यार्थिनीही या हल्ल्यात जखमी झाली. हल्ल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. गंभीर जखमी झालेली गोपिका वर्गातच रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.
शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी केली मदतीसाठी धावपळ
या भयंकर घटनेनंतर शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी स्थानिक पोलिसांना घटनेची माहिती दिली. तसेच गंभीर जखमी झालेल्या गोपिकाला तातडीने उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शाळेत धाव घेतली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष प्रयत्न सुरू केले असून, त्याला अटक करण्यासाठी शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे. या हिंसक घटनेमुळे परिसरातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रेमाला नकार दिल्याच्या रागातून हल्ला
पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपी हा गोपिकाचा दूरचा नातेवाईक असल्याचे समोर आले आहे. तो गेल्या काही काळापासून तिचा छळ करत होता. गोपिकाने त्याला आपल्यापासून दूर राहण्याचा इशारा दिला होता. तसेच त्याच्या त्रासाबाबत आई-वडिलांकडे तक्रार करण्याचेही सांगितले होते.
याच गोष्टीचा आरोपीला राग आला होता. गोपिकाने त्याला नकार दिल्यामुळे त्याच्या मनात तिच्याविषयी द्वेष निर्माण झाला. अखेर याच रागातून त्याने सरकारी शाळेतील वर्गात घुसून तिच्यावर क्रूर हल्ला केल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे.
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी व्यक्त केला संताप
अनंतपूर जिल्ह्यातील राप्ताडू येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये शुक्रवारी दहावीच्या विद्यार्थिनीवर झालेल्या या क्रूर हल्ल्याबद्दल आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी तीव्र दुःख आणि संताप व्यक्त केला आहे. भरदिवसा शाळेच्या वर्गात घुसून एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर इलेक्ट्रिक करवतीने करण्यात आलेल्या या हल्ल्यामुळे मुख्यमंत्री नायडू यांना मोठा धक्का बसला आहे.
घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांशी तत्काळ संपर्क साधला. त्यांनी जखमी विद्यार्थिनीच्या प्रकृतीची माहिती घेतली. तसेच तिला सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा आणि तातडीचे उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.