

BSF Samba encounter Jaish-e-Mohammed terrorists killed
जम्मू-काश्मीर: सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर घडलेली घटना युद्धजन्य स्थिती अधिक गंभीर होत असल्याचे संकेत देत आहे. सीमा सुरक्षा दलाने (BSF) गुरूवारी (दि.८) मध्यरात्री दहशतवादी घुसखोरीचा डाव हाणून पाडला आहे. यामध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित सात दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गुरूवारी ८ मे रोजी रात्री ११ वाजता BSF जवानांना संशयास्पद हालचाली दिसून आल्यावर त्यांनी तत्काळ कारवाई सुरू केली. या ऑपरेशनमध्ये पाकिस्तानच्या धंधार पोस्टचे दहशतवाद्यांकडून मोठे नुकसान करण्यात आले. कारवाईची अधिकृत माहिती BSF ने X (माजी ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केली.
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या लष्करी तणावाच्या दरम्यान ही घटना घडली. गुरुवारी (दि.९) भारताने जम्मू, पठाणकोट, उधमपूर येथील अनेक लष्करी प्रतिष्ठानांना क्षेपणास्त्रे आणि ड्रोन वापरून लक्ष्य करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न उधळून लावला, ज्यामुळे भारत-पाकिस्तान युद्ध आणखी चिघळत असल्याचे संकेत मिळत आहेत.
पाकिस्तानचा हा हल्ला ७ मे रोजी भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर केलेल्या हवाई हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी झाला. यानंतर पाकिस्तानकडून LOCवर शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरूच आहे. या हल्ल्यात सुमारे १०० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. हे प्रतिहल्ले पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून करण्यात आले होते. जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यात २६ पर्यटकांचा धार्मिक द्वेषातून लक्ष करून खून करण्यात आला होता.