

India-pakistan war : अमेरिका भारत आणि पाकिस्तानवर नियंत्रण ठेवू शकत नाही. आम्ही कोणत्याही युद्धात सहभागी होणार नाही, ते आमचे कामच नाही. मात्र दोन्ही अणुशक्ती असणार्या देशांमधील तणाव कमी करण्यासाठी प्रोत्साहित करू शकतो, असे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी स्पष्ट केले आहे.
एका मुलाखतीमध्ये बोलताना व्हान्स म्हणाले की, भारत आणि पाकिस्तान हे दोन अणुशक्ती असणारे देश आहेत. हे देश मोठ्या संघर्षाला जन्म देऊ शकतात. ट्रम्प प्रशासन भारत आणि पाकिस्तानमधील संभाव्य अणुयुद्धाबाबत चिंतीत आहे. तणाव लवकरात लवकर कमी व्हावा, अशी अमेरिका इच्छा व्यक्त करत आहे.
भारताला पाकिस्तानबाबत काही तक्रारी आहेत. आम्ही दोन्ही देशांना तणाव कमी करण्यासाठी प्रोत्साहित करू शकतो; पण युद्धात सहभागी होणार नाही. हे आमचं काम नाही. अमेरिका युद्ध नियंत्रित करण्याच्या क्षमतेशी संबंधित नाही. आम्ही दोन्ही देशांना शस्त्र खाली ठेवण्यास सांगू शकत नाही.मात्र कूटनीतिक मार्गांचा वापर करत राहू. दोन्ही देशांमधील प्रादेशिक संघर्ष अणुयुद्धात रूपांतरित होऊ नये. असं झाल्यास त्याचे परिणाम अत्यंत विनाशकारी असतील. तरीदेखील त्यांनी आशा व्यक्त केली की, असं काही घडणार नाही, अशी अपेक्षाही जेडी व्हान्स यांनी व्यक्त केली.
एकाचवेळी हवाई, जल आणि जमीन अशा तिहेरी मार्गाने भारतीय लष्कराने केलेल्या हल्ल्याने एकाच दिवसात जेरीस आलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मुस्लिम राष्ट्रांकडे दयेची भीक मागायला सुरुवात केली आहे. दरम्यान, युद्ध तातडीने थांबवा आणि भारताशी चर्चेसाठी सज्ज व्हा, अशा शब्दांत अमेरिकेने मात्र पाकिस्तानला सज्जड दम भरला आहे.
लाहोर, रावळपिंडी, कराचीसह पाकिस्तानातील प्रमुख १२ शहरांवर भारतीय हवाईदलाने गुरुवारी दिवसभरात जबरदस्त ड्रोन हल्ले चढवले. या स्फोटांच्या मालिकांनी पाकिस्तान हादरून गेले असून, घबराट उडाली आहे. क्वेट्टा आणि लाहोरवरही भारताने रात्री उशिरा ड्रोन हल्ले चढवले. लाहोरमध्ये 'आयएसआय'चे मुख्यालयही ड्रोन हल्ल्याने हादरले. बलुचिस्तानमध्ये बलुच लिबरेशन आर्मीने उठाव केल्याने पाकिस्तानची कोंडी झाली आहे. अनेक शहरांत नागरिक रस्त्यावर उतरून पाक सरकारविरोधात घोषणाबाजी करीत आहेत. पाकमध्ये गृहयुद्ध भडकले असून, लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर याला ताब्यात घेतल्याचेही सूत्रांनी सांगितले. बुधवारी रात्री उशिरा अमृतसरमधील सुवर्ण मंदिरासह १५ ठिकाणी पाकने ड्रोन व मिसाईल हल्ले केले; पण ते हवाईदलाने हाणून पाडले. भारतीय हवाईदलाने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम (हवाई संरक्षण कवच) नष्ट करण्यात आली.