Rajasthan Accident |
जयपूर : लग्नानंतर कुटुंब आणि नातेवाईकांसह घरी परतत असताना कारचा अपघात झाल्याने वधू-वरासह ५ जणांचा मृत्यू झाला, तर ६ नातेवाईक जखमी झाले. बुधवारी (दि. ११) सकाळी राजस्थानमधील जयपूरमध्ये हा भीषण अपघात झाला, यामुळे साता जन्माची साथ काही तासांतच सुटली!
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशमध्ये लग्न सोहळा आटोपून सर्वजण परतत होते. सकाळी दौसा-मनोहरपूर महामार्गावर भटकबास गावाजवळ कारची आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात वधू-वरांसह ५ जणांचा मृत्यू झाला, तर ६ जण जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्यांचीही प्रकृतीही गंभीर आहे.
धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला. अनेक लोक वाहनात अडकले, ज्यांना पोलिस आणि स्थानिक लोकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. अपघातानंतर महामार्गावर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती. स्थानिक लोकांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली, त्यानंतर रायसर पोलिस स्टेशन घटनास्थळी पोहोचले आणि बचाव कार्य सुरू केले.