

हंजगी : सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर कर्जाळ (ता. अक्कलकोट) येथील पुलावर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास भाविकांच्या ट्रॅव्हल्सची थांबलेल्या ट्रकला मागून धडक बसली. या अपघातात दोन प्रवासी जागीच ठार झाले. सात प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. इतर किरकोळ जखमी झाले आहेत. गौरीशंकर कुलकर्णी (वय 51, पुणे पोलीस), आकाश मुकेश जाधव (वय 32, ट्रीप आयोजक) अशी मृतांची नावे आहेत.
शेखर सिद्धाराम जाधव (वय 31), संगीता मुकेश जाधव (वय 55), वृंदा अरुण उंडाळे (वय 63), सुनीता शेलके (वय 45), मीना अरुण दरेकर, ज्योतिबा गावंडे, शकुंतला ओनवणे, महेश पवार (वय 28, बस ड्रायव्हर, सर्व रा. पुणे) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय, अश्विनी हॉस्पिटल कुंभारी तसेच सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे उपचार सुरू आहेत. पुणे येथील आर्या ट्रॅव्हल्सच्या बसची रस्त्याकडेला उभ्या असलेल्या मालट्रकला मागून धडक बसली. अपघातात गंभीर जखमी तिघांना अक्कलकोट ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. उर्वरित जखमींना दुसर्या ट्रव्हल्समधून पाठविण्यात आले.
अपघाताचे वृत कळताच पोलीस निरीक्षक महेश स्वामी, उत्तर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तत्काळ ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी पाठविले. मृतदेह काढण्यासाठी मनसेचे तालुकाध्यक्ष मल्लिनाथ पाटील यांनी ग्रामस्थासह पोलीसांना मदत केली. क्रेनच्या मदतीने ट्रव्हल्स बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली. अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्याचे सुरु होते.