

Crime News black magic ritual Chhattisgarh
कोरबा : कोट्यधीश होण्याचा शॉर्टकट म्हणून सुरू झालेला प्रकार थेट मृत्यूचा सापळा बनला. '५ लाख रुपये गुंतवा आणि रातोरात ते अडीच कोटी होतील,' असे आमिष दाखवून एका प्रसिद्ध व्यावसायिकासह तीन जणांना काळ्या जादूच्या जाळ्यात ओढण्यात आले. याच गूढ विधीत तिघांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यातील कुद्री गावात उघडकीस आली आहे.
बुधवारी उशिरा रात्री ही घटना घडली. भंगार व्यापारी मोहम्मद अश्रफ मेमन, कोरबा येथील सुरेश साहू आणि बलौदा बाजार येथील नितीश कुमार हे तिघे कुद्री येथील अश्रफ यांच्या फार्महाऊसवर मृतावस्थेत आढळले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'तंत्र-मंत्राच्या' सहाय्याने पैसे दुप्पट करण्याच्या विधीसाठी बिलासपूरहून एक जादूटोणा करणारा आणि त्याचे चार साथीदार आले होते. फार्महाऊसवरील एका खोलीत हा विधी सुरू असताना तिघांची प्रकृती बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेत सर्वात खळबळजनक म्हणजे मृतांपैकी एकाच्या तोंडात लिंबू आढळले, तर तिघांच्याही गळ्यावर गळा दाबल्याच्या खुणा दिसून आल्या आहेत. या खुणांमुळे हा मृत्यू केवळ विधी बिघडल्यामुळे झाला नसून, त्यामागे हल्ला किंवा खुनाची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या तिन्ही व्यक्तींना ५ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर रातोरात अडीच कोटी रुपये मिळतील, असे मोठे आमिष दाखवण्यात आले होते. अंधश्रद्धेपोटी तिघेही या विधीसाठी तयार झाले. मात्र, या पैशाच्या आमिषाने तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. कोरबाचे एस.पी. सिद्धार्थ तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'बैगा' (जादूटोणा करणारा) आणि त्याचे चार साथीदार अशा पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. घटनास्थळावरून काळ्या जादूचे साहित्य जप्त करण्यात आले असून ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहे.
दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांनी हा खून असल्याचा आरोप केला आहे. मृतदेहांवर मारहाणीच्या खुणाही आढळल्याचे त्यांनी सांगितले. या फार्महाऊसवर अनेक दिवसांपासून अशा जादूटोण्याचे प्रकार सुरू असल्याची अफवा होती. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक नेमले आहे.