

नवी दिल्ली : मतदार याद्यांतील कथित अनियमितता आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीने रविवारी काढलेल्या महारॅलीला भारतीय जनता पक्षानेही भव्य पदयात्रा काढत जोरदार प्रत्युत्तर दिले.
पश्चिम दिल्लीतील हरीनगर येथून पक्षाच्या वतीने 'लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ'चा पदयात्रा काढली. टिळकनगर मेट्रो स्थानकापर्यंत काढलेल्या या पदयात्रेत १९८४ मधील शीखविरोधी दंगलीप्रकरणी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यात आली. या हिंसाचाराबद्दल काँग्रेसने माफी मागावी, अशी मागणीही भाजप नेत्यांनी केली.
केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यावेळी म्हणाले, १९८४ मधील शीखविरोधी दंगल ही अचानक घडलेली नव्हती, तर ते नियोजनबद्ध हत्याकांड होते. काँग्रेसने या हिंसाचाराची जबाबदारी स्वीकारून माफी मागावी.
१ नोव्हेंबर १९८४ मध्ये शीखविरोधी दंगलीत अनेकांचा बळी गेला होता. या दंगलीच्या स्मृतींचा दिवस असताना काँग्रेसने याच दिवशी लोकशाही रक्षणाच्या नावाखाली राजकीय सभा घेतल्याचा आरोप दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी केला. हिंसाचारातील पीडित कुटुंबांच्या जखमांवर काँग्रेस राजकारणाचे मीठ चोळत असल्याची टीका त्यांनी केली. १९८४ मधील शीखविरोधी हिंसाचाराचा कलंक राहुल गांधी यांच्या लोकशाही रक्षणाच्या घोषणांनी पुसला जाणार नाही, असेही त्या म्हणाल्या.
या पदयात्रेत मुख्यमंत्री गुप्ता यांच्यासह दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा, मंत्री मनजिंदरसिंग सिरसा, आशीष सूद, ज्येष्ठ वकील एच. एस. फुलका, दिल्ली भाजपचे प्रभारी डॉ. विनय सहस्रबुद्धे, सहप्रभारी दर्शना जरदोश, खासदार कमलजीत सहरावत यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
व्होट चोरीचा आरोप करणाऱ्यांकडून संविधानाची चोरी : फडणवीस
ठाणे : काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांची खरी लढाई ही भारत आणि संविधानासोबत आहे. याचा इतिहास पाहिला तर, १९७५ मध्ये दिवंगत इंदिरा गांधी यांनी भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकली होती, तेव्हा न्यायालयाने त्यांची निवडणूक रद्द ठरवली होती. आज आम्हाला लोकशाहीचे धडे देणाऱ्या काँग्रेसने इंदिरा गांधींच्या कार्यकाळात काय झाले, याचा विचार केला पाहिजे. त्यावेळी संविधानाची मोडतोड करत न्यायालय आणि लोकशाहीला संपवण्याचे काम काँग्रेसने केले. आज व्होट चोरीचा आरोप करणाऱ्या याच लोकांनी प्रत्यक्षात संविधान चोरी केली आहे, असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
राहुल गांधी यांनी शिखांच्या जखमांवर मीठ चोळले ! 'रामलीला'वरील रॅलीवर अमित शहा यांचा हल्लाबोल
चंदीगड : राहुल गांधी यांच्या दुकानात फक्त विषच मिळते. १९८४ च्या शीखविरोधी दंगलीच्या वर्धापनदिनी दिल्लीत रॅली काढून 'इंडी' आघाडीने या दंगलीतील पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या जुन्या वेदनादायी आठवणींवर राहुल गांधी यांनी मीठ चोळले आहे, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीच्या रामलीला मैदानावर काढण्यात आलेल्या रॅलीवर कडाडून टीका केली.
चंदीगडमध्ये विकास प्रकल्पांच्या शिलान्यास समारंभादरम्यान शहा बोलत होते. १ नोव्हेंबर रोजी राजधानीत असा 'जल्लोष' (जलसा) आयोजित करून काँग्रेसने आपण असंवेदनशील असल्याचे दाखवून दिले, असा आरोप शहा यांनी केला. निवडणूक आयोगाविरुद्ध विरोधकांच्या 'मॉक पार्लमेंट' (प्रतीकात्मक संसद) वर भाष्य करताना शहा यांनी राहुल गांधी फक्त 'मॉक पार्लमेंट' मध्येच पंतप्रधान होऊ शकतात, असा उपरोधिक टोलाही लगावला.
१९८४ च्या दंगलीवरून शहांचा काँग्रेसवर संताप
१९८४ च्या शीखविरोधी दंगलीचा उल्लेख करत अमित शहा यांनी काँग्रेसवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. १ नोव्हेंबर १९८४ रोजी दिल्लीच्या रस्त्यांवर हजारो निष्पाप शिखांची निघृण हत्या केली गेली. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली, लोकांना जिवंत जाळण्यात आले, अबोध बाळे अनाथ झाली, महिला विधवा झाल्या आणि घरांची राख झाली. शिखांचा नरसंहार झाला, त्याच दिवशी राहुल गांधी यांनी रॅली आयोजित करून शिखांचा अपमान केला, असे शहा म्हणाले.