

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
मतचोरीच्या मुद्द्यावर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात दिल्लीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानावर 'व्होट बचाओ, देश बचाओ' सभेच्या माध्यमातून विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने रविवारी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या रॅलीसाठी १९ विरोधी पक्षांसह देशभरातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, पदाधिकारी दिल्लीत दाखल झाले होते.
सभेच्या निमित्ताने 'व्होट बचाओ, देश बचाओ' आणि 'व्होट चोर, गद्दी छोड' अशा घोषणांनी दिल्लीचे रस्ते दुमदुमून गेले. राजकीय कार्यकर्त्यांसोबतच साधू-संत, तरुण, महिला, विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती हे या सभेचे वैशिष्ट्य ठरले.
मिंटो रोड ते रामलीला मैदान, नेत्यांचा भव्य मोर्चा
इंडिया आघाडीच्या सभेपूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, राजद नेते तेजस्वी यादव, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत, भाकपचे नेते डी. राजा, पीडीपीच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती, भाकपचे नेते दीपंकर भट्टाचार्य, माकपचे नेते एम. ए. बेबी, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि केरळ काँग्रेसचे नेते व्ही. डी. सतीशन यांच्यासह विविध पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी मिंटो रोड ते रामलीला मैदान असा भव्य मोर्चा काढला. हे सर्व वरिष्ठ नेते खुल्या वाहनांतून सहभागी झाले होते. रस्त्यांच्या दुतर्फा हजारो लोकांनी गर्दी केली होती.
मैदानाबाहेरही गर्दीचा महापूर
रॅलीत सहभागासाठी देशभरातून नागरिक शनिवारी रात्रीपासूनच दिल्लीत दाखल झाले होते. रविवारी सकाळपर्यंत रामलीला मैदानासह परिसरातील रस्ते, चौक व उड्डाणपूल गर्दीन भरून गेले. मैदानापासून अनेक किलोमीटरपर्यंत जनसमुदाय दिसत होता. हातात तिरंगा, बॅनर व पोस्टर घेऊन आंदोलक 'व्होट चोर, गद्दी छोड'च्या घोषणा देत मैदानाकडे मार्गक्रमण करत होते. कर्नाटकातील आंदोलकांनी मतदार यादीतून नावे वगळल्याचा दावा असलेल्या मतदारांची नावे लिहिलेला अनेक मीटर लांबीचा कापडी बॅनर आणला होता.