Bihar News : शाळेच्या आवारात विद्यार्थी मृतावस्थेत, संतप्त कुटुंबीयाने शाळा पेटवली

Bihar News : शाळेच्या आवारात विद्यार्थी मृतावस्थेत, संतप्त कुटुंबीयाने शाळा पेटवली

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहारमध्ये धक्कादायक घटना समोर येत आहे. बिहारमधील दिघा येथील एका खाजगी शाळेच्या गटारीमध्ये चार वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. शाळेतच मुलाची हत्या करून मृतदेह वर्गाजवळच्या गटारात फेकल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या जमाव रस्त्यावर येत दानापूर-गांधी मैदान रस्ता अडवला, रस्त्यावर टायर जाळून जोरदार निदर्शने सुरू केली,  शाळेत घुसून तोडफोडही केली. जाणून घ्या काय आहे प्रकरण.

  • आयुष सकाळी सहा वाजता घऱातून बाहेर पडला पण तो रात्री पर्यंत घरीच आला नाही.
  •  शाळेच्या आवारात तो मृतावस्थेत आढळला.
  • आयुषच्या नातेवाईकांचा आरोप त्याची हत्या झाली आहे.
  • घटनेनंतर शाळेतील शिक्षक फरार

माहितीनुसार, बिहारची राजधानी पाटणामधील दिघा येथील खाजगी शाळेच्या गटारीमध्ये  एका विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला. आयुष कुमार शैलेंद्र राय, (वय ४, रा. रामजी चक, दिघा) असे मृत मुलाचे नाव आहे. आपल्या मुलाची हत्या करुन त्याचा मृतदेह गटारीमध्ये फेकून दिला, असा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी शाळेच्या आवारात टायर जाळून जोरदार निदर्शने केली, शाळेच्या वर्गखोलीमध्ये जात मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. शाळेतील  खोल्याही पेटवून दिल्या. शालेय वाहनांचेही नुकसान केले.

पोलीस काय म्हणाले

याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी लोकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र सर्वजण खुन्याला अटक करण्याच्या मागणीवर ठाम आहेत.  याबाबत पाटणाचे एसपी चंद्र प्रकाश माध्यमांशी बोलताना म्हणाले, "आम्ही सीसीटीव्हीमध्ये पाहिले की विद्यार्थी शाळेत प्रवेश करत आहे, परंतु  तो शाळेच्या आवारातून बाहेर पडताना दिसत नाही. तो आत होता. तर आम्ही हे प्रकरण  हत्या प्रकरण म्हणून चौकशी करू. मृतदेह पाहता  त्यातून गुन्हेगारी हेतू दिसून येतो. या प्रकरणी आम्ही तिघांना ताब्यात घेतले आहे. शाळा व्यवस्थापनाची चौकशी सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे."

कुटुंबीय म्हणाले…आयुषची हत्या?

आयुषचे कुटुंबीय माध्यमाशी बोलताना म्हणाले, आयुष गुरुवारी (दि.१६) सकाळी सहा वाजताच्या सुमारास  दिघा येथून घरातून शाळेसाठी (टायनी टॉट अकादमी) निघाला होता. क्लास संपल्यावर घरी यायचा. पण त्या दिवशी तो रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने आम्ही शाळेच्या मुख्याध्यापकांना फोन केला. मुलगा शाळेत नसल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर आम्ही शाळेत पोहोचलो. शालेय वाहनाच्या चालकाला विचारले.  त्यानंतर चालकाने सांगितले की, तो साडेसहा वाजता सर्व मुलांना शाळेत घेऊन गेला होता. यानंतर आम्ही शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले. दुपारी बाराच्या सुमारास आयुष शाळेत दिसला. यानंतर सीसीटीव्ही फुटेजमधील अनेक शॉर्ट्स गायब असल्याचे आढळून आले.

 शाळेतील सर्व शिक्षक फरार

मुलाची हत्या केल्यानंतर मृतदेह शाळेच्या चेंबरमध्येच फेकल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेऊन मारेकऱ्यांना अटक करावी अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. घटनेनंतर शाळेतील सर्व शिक्षक फरार झाले आहेत. जोपर्यंत पोलिस मुलाच्या मारेकऱ्याला अटक करत नाहीत तोपर्यंत त्यांचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news