

Narendra Modi Mukhyamantri Mahila Rojgar Yojana :
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज बिहारमधील लाडक्या बहिणींसाठी एक खास योजना जाहीर करणार आहेत. यात राज्यातील जवळपास ७५ लाख महिलांना फायदा होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. बिहारमधील ७५ लाख महिलांच्या बँक खात्यात थेट १० हजार रूपये जमा होणार आहेत. यासाठी ७ हजार ५०० कोटींचा खर्च येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याबाबतचे वृत्त हिंदूस्तान टाईम्सनं दिलं आहे.
या योजनेला मुख्यमंत्री महिला रोजगार योजना असं नाव देण्यात आलं आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजाना सुरू करण्यात येत आहे. याद्वारे महिलांचे सबलीकरण होईल असा देखील विश्वास प्रशासनाला आहे.
या योजनेच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे उपस्थिती लावतील. ही योजना वेगळी असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. याद्वारे बिहार राज्यातील प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला याचा लाभ मिळणार असून त्यांना रोजगार सुरू करण्यास आणि त्यांचा आवडीचा उदरनिर्वाह निर्माण करण्याची मुभा देण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत सुरूवातीला महिलांना १० हजार रूपयाचं अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. याचबरोबर टप्प्या टप्प्यानं जवळपास २ लाखापर्यंतची आर्थिक मदत देखील करण्यात येईल. यातील लाभार्थी महिलांना स्वयम सहाय्यता गटाशी जोडण्यात येईल.
तिथं त्यांना रोजगार सुरू करण्यासाठी ट्रेनिंग देखील देण्यात येईल. यासाठी राज्यात ग्रामीण बाजारपेठ देखील उपलब्ध करून देण्यात येईल. निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील सत्ताधारी एनडीएनं केंद्र आणि राज्य स्तरावर अनेक योजना सुरू केल्या आहेत.