

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : बांगला देशात शेख हसीना यांचे सरकार गेल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेचा फायदा घेत पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी संघटना ‘हरकत-उल-जिहादी-इस्लामी’ (हुजी) पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, ही संघटना भारताच्या सीमेवर, विशेषतः पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांना लक्ष्य करण्यासाठी आपले तळ पुन्हा उभारण्याच्या प्रयत्नात आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आयएसआय’ आणि बांगला देशातील कट्टरपंथी गटांकडून ‘हुजी’ला सर्वतोपरी मदत मिळत असल्याने भारताच्या सुरक्षेपुढील आव्हान अधिक गडद झाले आहे.
‘हुजी’ या दहशतवादी संघटनेची स्थापना मूळतः पाकिस्तानात झाली होती. लष्कर-ए-तोयबासोबत मिळून जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता पसरवणे हे तिचे सुरुवातीचे उद्दिष्ट होते. मात्र, काश्मीरमध्ये ‘जैश-ए-मोहम्मद’चा प्रभाव वाढत असताना ‘आयएसआय’ने हळूहळू ‘हुजी’च्या कारवाया बांगला देशात स्थलांतरित केल्या. पश्चिम बंगाल आणि भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये दहशतवादी हल्ले घडवणे हा त्यामागील मुख्य उद्देश होता.
गेल्या काही वर्षांत भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या कडक कारवाईमुळे आणि शेख हसीना सरकारने बांगला देशात ‘हुजी’वर कठोर नियंत्रण ठेवल्यामुळे या संघटनेची ताकद क्षीण झाली होती. मात्र, आता मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार सत्तेवर आल्यानंतर ‘जमात-ए-इस्लामी’सारख्या कट्टरपंथी संघटना पुन्हा सक्रिय झाल्या आहेत आणि त्यांच्या आश्रयाने ‘हुजी’सारख्या दहशतवादी संघटनांनी डोके वर काढले आहे.
नुकतेच न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी बांगला देशचे अंतरिम प्रमुख मोहम्मद युनूस यांची भेट घेतली. दोन्ही देशांमधील व्यापार वाढवणे हा या भेटीचा उद्देश असल्याचे वरकरणी सांगण्यात आले असले, तरी यामागे वेगळेच राजकारण असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाकिस्तान आणि बांगला देश यांच्यातील वाढत्या जवळकीमुळे ‘आयएसआय’ला बांगला देशात आपले जाळे पसरवणे अधिक सोपे झाले आहे.
2004 मध्ये शेख हसीना यांच्यावर झालेल्या ग्रेनेड हल्ला प्रकरणात त्याला 2008 मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, 17 वर्षांच्या तुरुंगवासानंतर नुकतीच त्याची सुटका करण्यात आली आहे. अटक होण्यापूर्वी पिंटूने पाकव्याप्त काश्मीरमधील शिबिरांमध्ये ‘हुजी’ला शस्त्रखरेदी, दहशतवाद्यांची भरती आणि प्रशिक्षणासाठी मोठी मदत केली होती. भारतीय सुरक्षा अधिकार्यांच्या मते, पाकिस्तान आणि बांगला देश यांच्यातील वाढती मैत्री आणि पिंटूची झालेली सुटका, यामुळे तो पुन्हा ‘हुजी’मध्ये सामील होण्याची दाट शक्यता आहे.
गुप्तचर विभागाच्या (आयबी) अधिकार्यांच्या मते, गेल्या तीन महिन्यांत ‘आयएसआय’ आणि ‘हुजी’च्या नेत्यांमध्ये किमान सहा बैठका झाल्या आहेत. ‘हुजी’ला पुन्हा सक्रिय करणे आणि भारतीय सीमेवर नवीन तळ उभारणे हा या बैठकांचा मुख्य अजेंडा होता. ‘जमात-ए-इस्लामी’ने ‘हुजी’ला सुरक्षेची हमी दिली असून, शस्त्रे, दारूगोळा आणि निधी पुरवण्याचे आश्वासनही दिले आहे.
बांगला देशात ‘हुजी’च्या पुनरुज्जीवनामागे आणखी एक मोठे कारण म्हणजे दहशतवादी अब्दुस सलाम पिंटू याची तुरुंगातून झालेली सुटका. पिंटू हा बांगला देश नॅशनालिस्ट पार्टीशी (बीएनपी) संबंधित असून, त्याच्यावर पाकव्याप्त काश्मीरमधून (पीओके) दहशतवाद्यांना निधी पुरवल्याचा आरोप होता.