

पटनाः लोकगायिका मैथिली ठाकूर मंगळवारी भारतीय जनता पक्षात (भाजप) सामील झाल्या. पक्षाच्या सूत्रांनुसार, त्यांना दरभंगा येथील अलीनगर मतदारसंघातून बिहार विधानसभेत उमेदवारी देण्यात येण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर, सोशल मीडियावरील मैथिली ठाकूरचा प्रचंड चाहता वर्ग आणि मिथिला प्रदेशातील तिची लोकप्रियता लक्षात घेता, भाजपने तिला आपल्या प्रचाराचा चेहरा बनवले आहे.
काही दिवसांपूर्वी मैथिली हिने गेल्या आठवड्यात भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची भेट घेतली होती. त्याचवेळी ती भाजपबरोबर जाणार असल्याच्या शक्यता होत्या. आज तिने पटणा येथे बिहारचे भाजपा प्रमुख दिलीप जैस्वाल यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला.
दरम्यान दरभंगामधील अलीनगर या मतदारसंघातून तिला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. या चर्चा सुरु असताना मिश्रीलाला यादव या विद्यमान आमदारांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. 2020 मध्ये ते इन्सान पक्षातून निवडून आले होते. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
यावेळी बोलताना स्वतः मैथिलीने सांगितले आहे की, “माझे उद्दिष्ट निवडणूक लढवणे नाही — पक्ष जे सांगेल ते मी करीन.” पण भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीमध्ये त्यांच्या नावाचा समावेश आलेला नाही. या निवडणूकीत जर अलिनगरमधून मैथिली ठाकूर ही विजयी झाली तर भाजपचा हा पहिला विजय ठरेल. आजपर्यत एकदाही या मतदारसंघात भाजपाला विजय मिळवता आला नाही.
कोण आहेत मैथिली ठाकूर
या भारतातील लोकप्रिय आणि प्रतिभावान तरुण गायिका आहेत. त्या खासकरून भारतीय लोकसंगीत, भजन, आणि पारंपरिक गाण्यांसाठी ओळखल्या जातात. बिहारमधील मधुबनी येथे 2000 साली मैथिली यांचा जन्म झाला. मैथिली ठाकूर यांनी अतिशय लहान वयात संगीताचे शिक्षण घेतले. त्यांचे वडील रमेश ठाकूर हेच त्यांचे पहिले गुरु आहेत. त्या सोशल मीडियावर लोकसंगीत, भजन, आणि संतवाणी गाताना दिसतात, ज्यामुळे त्यांचे लाखो चाहते झाले आहेत.