

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या घोषणेसह बिहारमध्ये पुन्हा लोकशाहीचा भव्य उत्सव सुरू झाला. यावेळी विधानसभेच्या निवडणुका केवळ दोन टप्प्यांत होणार आहेत. बिहारसाठी ही सामान्य बाब नाही. एकेकाळी मतदान बूथवर ताबा मिळवणे आणि ‘मसल पॉलिटिक्स’साठी ओळखले जाणारे हे राज्य आता शिस्त आणि विश्वासाचे प्रतीक बनताना दिसत आहे. तेथील निवडणूक शिस्त, विश्वास आणि मतदारांच्या सहभागाचा उत्सव असेल, अशी आशा आहे. हे तेच राज्य आहे ज्याने जयप्रकाश नारायण यांच्या आवाहनावर हुकूमशाहीला पराभूत केले आणि महात्मा गांधी यांना चंपारण्य दिले. संपूर्ण देशाला शिकवले की, लोकशाही केवळ मतदानाचा अधिकार बजावण्यापुरती मर्यादित नाही, तर लोकशाहीने दिलेल्या अधिकाराबद्दलचीही आहे.
बिहारमध्ये केवळ राजकारण केले जात नाही, तर ते जगले जाते. बिहार आर्थिकद़ृष्ट्या मागासलेले मानले जाऊ शकते; पण राजकीयद़ृष्ट्या ते सर्वात परिपक्व राज्य आहे. त्याच्या मातीतून क्रांतीचा वास येतो. ही तीच भूमी आहे, जिथे ब्रिटिशांविरुद्ध पहिला लढा दिला गेला, जयप्रकाश नारायण यांना ‘लोकनायक’ बनवले गेले. तेथे लोकशाही ही केवळ एक व्यवस्था नाही, ती एक जीवनशैली आहे. ही निवडणूक फक्त सत्तेबद्दल नाही, तर विचारांबद्दलही आहे. बिहार जातीच्या समीकरणांच्या पलीकडे जाईल का? तरुण जातीपेक्षा रोजगार आणि शिक्षणाला प्राधान्य देतील का? यावेळी महिला निर्णायक भूमिका बजावतील का, हे प्रश्न या राज्याच्या प्रत्येक गावात आणि चौकात प्रतिध्वनीत होत आहेत. यावेळी लढाई चुरशीची आणि अटीतटीची आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि इंडिया आघाडीमधील लढाई जुनी आहे; मात्र आता संदर्भ बदलले आहेत. दिल्लीच्या राजकारणाशी बिहारची केली जाणारी तुलना चुकीची आहे.
दिल्ली आणि बिहार ही दोन वेगळी राज्ये आहेत. दिल्लीत राजकारण विचारांनी, तर तेथे भावनांनी चालते. दिल्लीत सत्ता मिळवण्यासाठी घोषणांची गरज असते, बिहारमध्ये विश्वासाची! मतदार पोस्टर किंवा प्रचारावर नव्हे, तर स्वतःच्या अनुभवावर निर्णय घेतात. तेथील गावातील रस्त्यावर बसलेला एक वृद्ध शेतकरी, रिक्षा चालवणारा एक तरुण, चहाच्या टपरीवर वाद घालणारा एक शिक्षक, तेथील प्रत्येकाला राजकारण समजते. मतदार कदाचित सुशिक्षित नसेल; पण तो राजकीयद़ृष्ट्या साक्षर आहे. प्रत्येक रस्त्यावर एक विश्लेषक असतो, जो जातीय समीकरणे, आघाड्यांची ताकद आणि नेत्याच्या हेतूंवर त्यांचे मत मांडतो. ही बिहारच्या लोकशाहीची ताकद आहे. एनडीएमध्ये भाजप, जदयू आणि लोजपा यांचा समावेश आहे.
हिंदुत्ववादी विचारांसह उच्च जातींमधील मतदारांवर भाजपची मजबूत पकड आहे, तर जदयू मागास वर्गातील मतदारांवर आणि महिलांवर अवलंबून आहे. नितीशकुमार यांची सर्वात मोठी ताकद महिला मतदारांमध्ये आहे. महिलांनी त्यांना वारंवार सत्तेत परत आणले. आरक्षण आणि दारूबंदीवरील त्यांच्या निर्णयांमुळे महिला मतदारांमध्ये त्यांच्याशी भावनिक बांधिलकी निर्माण झाली. दुसरीकडे भाजप विकास आणि राष्ट्रीय नेतृत्वाच्या नावाखाली मते मागतो आहे. नितीश कुमार यांचे वय आणि थकवा लोकांना दिसत असला, तरीही भाजप आणि त्यांच्या पक्षाची आघाडी अजूनही एक मजबूत जोडी आहे. ‘लोजपा’चे चिराग पासवान त्यांच्या वडिलांच्या राजकीय छत्रछायेतून बाहेर पडण्यासाठी संघर्ष करत आहेत. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे त्यांचे मनोबल वाढले आहे; पण त्यांच्या स्वतःच्या गटात त्यांना धोका आहे.
त्यांचे काका पशुपती पारस, आता इंडिया आघाडीशी जवळीक साधत आहेत. दलित मतांमध्ये फूट पडणे एनडीएसाठी हानिकारक ठरेल. जीतन राम मांझी आणि उपेंद्र कुशवाहा यांसारख्या नेत्यांचा प्रभाव मर्यादित असू शकतो; पण बिहारच्या जातीय समीकरणांमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. म्हणूनच एनडीएत अजूनही युती एकसंध असल्याचे दिसून येते. राष्ट्रीय जनता दल हा इंडिया आघाडीचा प्राणवायू आहे. लालूप्रसाद यादव यांचे एमवाय समीकरण, त्यांची ही मुस्लीम आणि यादव मतपेटी अबाधित आहे. या दोन्ही समाजांतील एकत्रित मते बिहारमधील कोणत्याही निवडणुकीचा निकाल बदलू शकतात.
तेजस्वी यादव यांनी बेरोजगारी, स्थलांतर आणि सामाजिक न्याय याबद्दल तरुणांच्या भाषेत बोलून तरुणांचे लक्ष वेधले आहे; पण राजदचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे त्याची प्रतिमा. सत्तेत आल्यानंतर जंगलराज परत येते, असा या पक्षावर जुना आरोप. तेजस्वी ही प्रतिमा झटकून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत; पण मार्ग सोपा नाही. काँग्रेस हा इंडिया आघाडीतील कमकुवत दुवा आहे. राहुल गांधी यांच्या मतदार हक्क यात्रेने काही ऊर्जा निर्माण केली; पण पक्षातील संघटनात्मक सुस्ती कायम आहे. यात्रा संपताच काँग्रेस पुन्हा पारंपरिक सुस्तीकडे वळल्याचे दिसते. डावे आणि मुकेश साहनी यांच्या पक्षाचा प्रभाव मर्यादित आहे; पण विरोधी मते एकत्र राहिली, तर बदल अशक्य नाही. या लढाईत एक नवीन खेळाडू म्हणजे प्रशांत किशोर यांनी उडी घेतली आहे. एकेकाळी राजकारणाचे चाणक्य म्हणून ओळखले जाणार्या या रणनीतीकारांचा जनसुराज पक्ष निवडणूक रिंगणात आहे.
त्यांचे स्वप्न ‘बिहारचे केजरीवाल’ बनण्याचे आहे; पण त्यांचा मार्ग कठीण आहे. ही अशी भूमी आहे, जी दिल्लीतील शक्तींना सातत्याने संकेत देत असते. येथेच खरी राजकारणाची नाडी धडधडते. म्हणूनच ही निवडणूक केवळ एका राज्याची नाही, तर संपूर्ण देशाची राजकीय दिशा ठरवेल. एनडीए पुन्हा सत्तेत आली, तर तो पंतप्रधान मोदी आणि भाजपसाठी राजकीय स्थिरतेचा संदेश असेल. तो देशाच्या विकासाला गती देणारा ठरेल. विरोधी पक्ष विशेषतः तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया’ आघाडी जिंकली, तर तो सत्ताधार्यांना इशारा असेल. हे केवळ एक राज्य नाही, तर राजकीय बॅरोमीटर असल्याने देशाची जनता कोणत्या दिशेने विचार करत आहे, याची ही चाचणी ठरेल.