

Bihar Assembly Election 2025 BJP Candidate First List
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर करायला सुरूवात केली आहे. भारतीय जनता पक्षाने (भाजप) मंगळवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून अपेक्षेप्रमाणे भाजपने धक्कातंत्राचा अवलंब करणे टाळले आहे. भाजपच्या पहिल्या यादीत एकूण 71 उमेदवारांचा समावेश आहे. बहुचर्चित मैथिली ठाकूर आणि पवन सिंह यांना देखील पहिल्या यादीत स्थान मिळालेले नाही.
भाजपाने मंगळवारी 71 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात एकूण ९ महिलांना तिकीट देण्यात आले आहे. पहिल्या यादीत भाजपने अनुभवी आणि बड्या नेत्यांच्या कामगिरीवर विश्वास दर्शवत त्यांना उमेदवारी दिली आहे. काही माजी मंत्री आणि दुसऱ्या विजयी झालेल्या काही आमदारांचा पत्ता मात्र कापण्यात आला आहे.
अनुभवी चेहऱ्यांना पुन्हा संधी
उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना तारापूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. माजी उपमुख्यमंत्री रेणू देवी यांना बेतिया विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय मंत्री नितीन नवीन यांना बांकीपूर, मंगल पांडे यांना सिवानमधून तर संजय सरावगी यांना दरभंगा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. तर नीरज कुमार बबलू हे छातापूरमधून निवडणूक लढवणार आहेत.
ओबीसी नेत्याला उमेदवारी
माजी खासदार रामकृपाल यादव हे केंद्रीय राजकारणात सक्रीय होते. बिहारमधील ओबीसी समाजाचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. रामकृपाल यांना दानापूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
मैथिली ठाकूरला उमेदवारी नाही
प्रसिद्ध लोकगायिका मैथिली ठाकूरला अलीनगर किंवा बेनीपट्टी या मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याची चिन्हे होती. मैथिलीने नुकतीच भाजप नेते विनोद तावडे यांची भेट घेतली होती. तेव्हापासून मैथिली ही भाजपकडून निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. खुद्द मैथिलीनेही याबाबत सूचक विधान करत मी राजकारणात येण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले होते. मात्र, भाजपने पहिल्या यादीत बेनीपट्टी मतदारसंघातून उमेदवार दिल्याने मैथिलीच्या उमेदवारीबाबत अद्याप अंतिम निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आता मैथिलीला आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार की भाजप तिच्याकडे वेगळी जबाबदारी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बेनीपट्टीमधून भाजपने 68 वर्षांच्या विनोद नारायण झा यांना दुसऱ्यांदा संधी दिली आहे. 1977 मधील जेपी आंदोलनात ते सक्रीय होते. याशिवाय ते दोन वेळा आमदार आणि एकदा विधान परिषदेत आमदारही होते.
भाजपच्या पहिल्या यादीचा राजकीय अर्थ काय?
बिहार निवडणुकीत उमेदवारांच्या पहिल्या यादीवरून भाजपने सावध भूमिका घेतल्याचे दिसते. भाजपने अनुभवी नेत्यांवर विश्वास दाखवत जोखीम पत्करणे टाळले आहे. राज्यात पक्ष भक्कम स्थितीत यावा यावर भाजप नेतृत्वाने भर दिला आहे, असं राजकीय विश्लेषकांनी सांगितले.