

प्रशांत वाघाये
नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जवळ येत असताना एनडीएने बिहारसाठी जागा वाटपाचा आकडा जाहीर केला. २४३ सदस्य बिहार विधानसभेत एनडीए मधून भाजप १०१ जागा तर नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाला (जदयू) १०१ जागा, चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला (रामविलास) २९ जागा आणि जीतनराम मांझी यांचा पक्ष हिंदुस्तान अवाम मोर्चा (हम), उपेंद्र कुशवाहा यांचा राष्ट्रीय लोक मोर्चा या दोन पक्षांना प्रत्येकी ६ जागा देण्यात आल्या आहेत.
रविवारी संध्याकाळी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली या बैठकीच्या पूर्वी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि बिहारचे प्रभारी विनोद तावडे यांनी हे जागावाटप जाहीर केले. या जागा वाटपाने अनेक गोष्टी स्पष्ट केल्या. सर्वप्रथम मागील विधानसभा निवडणुकीत मोठ्या भावाच्या भूमिकेत असलेला जदयू आता भाजपच्या बरोबरीत आहे.
जागावाटपात जदयू मोठ्या भावाच्या भूमिकेत नाही
मागील विधानसभा निवडणूक देखील नितीश कुमार यांनी भाजपासोबत लढवली होती. त्यावेळी नितीश कुमार यांचा पक्ष मोठ्या भावाच्या भूमिकेत होता. स्वाभाविकच नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद मिळाले. नंतर त्यांनी भाजपशी फारकत घेतली आणि लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत घरोबा केला. २ वर्षांनी पुन्हा भाजपसोबत येत त्यांनी सरकार स्थापन केले. या सगळ्या ५ वर्षांच्या घडामोडीत नितीश कुमार मुख्यमंत्रीपदी कायम राहिले. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांचा पक्ष मोठ्या भावाच्या भूमिकेत नसून भाजपसोबत बरोबरीत आहे.
मुख्यमंत्री पदासाठी बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न?
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडली तेव्हा मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान होते. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर ज्यांचे आमदार जास्त त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री असे धोरण राबवण्यात आले आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. आता बिहार विधानसभा निवडणुकीत जदयू आणि भाजप सारख्या जागा लढवत आहेत. यामध्ये जर भाजपाला जदयूपेक्षा अधिक जागा जिंकता आल्या तर बिहारमध्येही मुख्यमंत्री पदासाठी महाराष्ट्र पॅटर्न राबवला जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या स्वप्नावर पाणी फिरवले जाऊ शकते.
चिराग पासवान होतील बिहारचे अजित पवार !
चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला (रामविलास) एनडीएने २९ जागा दिल्या. चिराग पासवान यांना २० जागा मिळतील अशी अपेक्षा असताना त्यांना ताकद देत २९ जागा देण्यात आल्या त्यामुळे भाजपने एक प्रकारे चिराग पासवान यांना अधिक जवळ केले. त्यामुळे बिहारमध्ये सत्ता आल्यास भाजपने विविध राज्यांमध्ये राबवलेल्या सूत्राप्रमाणे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री अशी योजना आणली जाऊ शकते. त्यात चिराग पासवान यांच्या पक्षाला दुसरे उपमुख्यमंत्री पदही दिले जाऊ शकते. नितीश कुमार यांच्यासाठी मात्र ही धोक्याची घंटा आहे.