

Shocking crime news
भोपाळ : येथे अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. एका स्नूकर क्लबमध्ये किरकोळ वादातून १० वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर केवळ ३० सेकंदात २७ वेळा चाकूने हल्ला करण्यात आला.धक्कादायकबाब म्हणजे घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आरोपींनी स्वतःच सोशल मीडियावर व्हायरल केले आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन अल्पवयीन मुले एका स्नूकर क्लबमध्ये जाताना दिसतात. आत शिरताच त्यांनी १६ वर्षांच्या मुलाला कोपऱ्यात गाठतात. त्याच्यावर चाकू व खंजीरने सपासप वार केली. अवघ्या ३० सेकंदांत या मुलावर २७ वेळा वार करण्यात आले आणि त्यानंतर हल्लेखोर तिथून पळून गेले. या भीषण हल्ल्यात मुलाच्या एका मनगटावर १० पेक्षा जास्त खोल जखमा झाल्या आहेत.दुसऱ्या हाताची दोन बोटे कापली गेली आहेत.खांदा आणि पाठीवरही गंभीर वार झाले आहेत. एवढ्या भयानक हल्ल्यानंतरही तो मुलगा जिवाच्या आकांताने तिथून निसटला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलीस तपासात या घटनेमागचे धक्कादायक कारण समोर आले आहे. जखमी झालेला विद्यार्थी आणि मुख्य आरोपी (जो स्वतः १० वीत शिकतो) हे एकाच क्लासमध्ये एकत्र शिकतात.काही दिवसांपूर्वी स्नूकर (पूल) खेळताना वर्चस्वावरून त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले होते. त्या वादादरम्यान एकाने मुलाने दोन्ही आरोपींच्या कानशिलात लगावली होती. याच अपमानाचा बदला घेण्यासाठी १५ फेब्रुवारी रोजी हा पूर्वनियोजित हल्ला करण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ रविवारी (दि. २२) सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामुळे संपूर्ण भोपाळ शहरात संतापाची लाट पसरली आहे.
या प्ररणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरुवात केली आहे. मात्र, या प्रकरणातील काही कायदेशीर बाबींमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. स्थानिक पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, सध्या मारहाणीच्या कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. विद्यार्थ्याचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतर आणि जखमांची तीव्रता पाहून अधिक गंभीर कलमे लावली जातील.दोन्ही आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांना ताब्यात घेऊन नोटीस बजावण्यात आली आणि त्यानंतर सोडून देण्यात आले आहे. आरोपींनी स्वतःच या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.यामुळे लोकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.