

Mandya Father Burns Son-in-law’s House
चिक्कोडी : पुढारी वृत्तसेवा
मुलीने वडिलांच्या विरोधाला न जुमानता प्रेमविवाह केल्याने संतप्त झालेल्या वडिलांनी जावयाचे घर पेटवून दिल्याची धक्कादायक घटना कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यात घडली. या आगीत जावयाचे घर जळून खाक झाले असून, संतापलेल्या सासऱ्यालही किरकोळ जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंड्या जिल्ह्यातील मद्दूर तालुक्यातील चुंचगहळळी गावातील तरुणीचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र, वडील चन्नेगौडा यांचा विवाहाला तीव्र विरोध होता. वडिलांच्या विरोधाला न जुमानता मुलीने गुरुवारी विवाह केला. आपल्या मर्जीविरुद्ध मुलीने लग्न केल्यामुळे चन्नेगौडा प्रचंड संतापले होते.
लग्नामुळे संतप्त झालेल्या चन्नेगौडा यांनी थेट जावई विनोद याचे घर गाठले आणि घराला आग लावून दिली. ही आग इतकी भीषण होती की यामध्ये विनोदचे संपूर्ण घर जळून खाक झाले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ माजली आहे.
जावयाचे घर पेटवत असताना चन्नेगौडा हे स्वतःदेखील आगीच्या ज्वाळांमुळे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारांसाठी बेंगळुरू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना मद्दूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.