

Crime News
भोपाळ: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका ११ वीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर चार वेगवेगळ्या कारमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नराधमांनी केवळ अत्याचारच केला नाही, तर त्याचे चित्रीकरण करून पीडितेकडे खंडणीची मागणी करत तिला वारंवार ब्लॅकमेल केले. याप्रकरणी पोलिसांनी 'थार'सह चार वाहने जप्त केली असून मुख्य आरोपीसह त्याच्या साथीदाराला बेड्या ठोकल्या आहेत.
या प्रकरणातील मुख्य आरोपी औसाफ अली खान याला ३ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली असून तो सध्या तुरुंगात आहे. त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी त्याचा साथीदार आणि जिम चालक माज खान याला ८ फेब्रुवारी रोजी अटक केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस आयुक्तांनी एसीपी अंकिता खात्रकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन केली आहे. तपासादरम्यान पोलिसांना आढळले की, पीडित मुलीवर वेगवेगळ्या ठिकाणी चार वेगवेगळ्या कारमध्ये अत्याचार करण्यात आला.
पोलीस चौकशीत धक्कादायक खुलासे झाले आहेत. आरोपी माज खानने चौकशीत कबूल केले की, औसाफ अली खानने खानूगाव परिसरात एका थार गाडीत पीडितेवर अत्याचार केला. यावेळी माज खान बाहेर उभा राहून खिडकीतून आयफोनवर या कृत्याचे गुपचूप रेकॉर्डिंग करत होता. आरोपींनी हा व्हिडिओ एकमेकांना शेअर केला आणि तो व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडितेकडून ४०,००० रुपयांची खंडणी मागितली. इतकेच नव्हे तर, या व्हिडिओच्या जोरावर तिला वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचे तपासात समोर आले आहे.
गुन्ह्यात वापरलेली कार सीहोर जिल्ह्यातील एका गावात लपवून ठेवली होती, जी पोलिसांनी जप्त केली आहे. मात्र, व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी वापरलेला आयफोन अद्याप हस्तगत झालेला नाही. तपासादरम्यान असेही समोर आले आहे की, माज खानचे कोहेफिजा पोलिस ठाण्यातील एका हेड कॉन्स्टेबलशी संबंध होते. या हवालदारावर गोपनीय माहिती लीक केल्याचा आरोप असून त्याला निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास 'एसआयटी'कडून (SIT) अद्याप सुरू आहे.