

नवी दिल्ली: भगवान बुद्धांचे अवशेष केवळ कलाकृती नसून ते भारताच्या वारशाचा एक भाग असून आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. १८९८ मध्ये सापडलेल्या पिप्रहवा येथील अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भगवान बुद्ध सर्वांचे आहेत आणि ते सर्व लोकांना एकत्र आणतात. सव्वाशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, भारताचा वारसा परत आला आहे, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, किरेन रिजिजू, रामदास आठवले, राव इंदरजित सिंह तसेच दिल्लीचे उपराज्यपाल विनय सक्सेना यांची प्रमुख उपस्थिती होती. भगवान बुद्धांनी दिलेले ज्ञान आणि दाखवलेला मार्ग संपूर्ण मानवजातीसाठी आहे. भारत केवळ भगवान बुद्धांच्या अवशेषांचा संरक्षक नाही, तर त्या कालातीत परंपरेचा एक जिवंत वाहक देखील आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. भारताने जगभरातील बौद्ध वारसा स्थळांच्या विकासासाठी योगदान देण्याचे सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत. भगवान बुद्धांची शिकवण मूळतः पाली भाषेत आहे, पाली भाषा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
भगवान बुद्धांच्या आशीर्वादाने २०२६ हे वर्ष जगासाठी शांतता, समृद्धी आणि सलोख्याचा नवा अध्याय घेऊन येवो, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. भगवान बुद्धांचे अवशेष आपल्या सानिध्यात असणे हे सर्वांसाठी एक मोठा आशीर्वाद आहे, असे ते म्हणाले. या अवशेषांचे भारतातून बाहेर जाणे आणि नंतर परत येणे, या दोन्ही घटना स्वतःच महत्त्वपूर्ण धडे आहेत. गुलामगिरी केवळ राजकीय आणि आर्थिक नसते, तर ती आपला वारसाही नष्ट करते, हाच यामागील धडा आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
भगवान बुद्धांच्या अवशेषांच्या बाबतीतही असेच घडले. हे अवशेष गुलामगिरीच्या काळात देशाबाहेर नेले गेले आणि सुमारे सव्वाशे वर्षे देशाबाहेर राहिले, यांची त्यांनी आठवण करून दिली. ज्यांनी हे अवशेष नेले, त्यांच्यासाठी आणि त्यांच्या वंशजांसाठी हे अवशेष केवळ निर्जीव, पुरातन वस्तू होत्या, असे ते म्हणाले. म्हणूनच त्यांनी हे पवित्र अवशेष आंतरराष्ट्रीय बाजारात लिलावात विकण्याचा प्रयत्न केला, असे त्यांनी सांगितले. मात्र, भारतासाठी हे अवशेष आपल्या पूजनीय देवतेचा एक भाग आहेत, आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले. त्यांचा सार्वजनिक लिलाव होऊ दिला जाणार नाही, असा निर्णय भारताने घेतला, हे त्यांनी जाहीर केले.
भगवान बुद्ध हे जीवनाचा अविभाज्य भाग आहेत, आणि त्याबद्दल स्वतःला भाग्यवान मानतो असे पंतप्रधान म्हणाले. जन्मगाव असलेले वडनगर हे बौद्ध शिक्षणाचे एक मोठे केंद्र होते आणि जिथे भगवान बुद्धांनी पहिला उपदेश दिला, ते सारनाथ ही आपली कर्मभूमी असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. ज्या ज्या देशांना भेटी दिल्या, तिथली भगवान बुद्धांच्या वारशाची प्रतीके मायदेशी परत आणण्याचे प्रयत्न केल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली.