मुंबई : पिप्राहवा तथा कपिलवास्तू परिसरातील उत्खननात आढळलेले तथागत गौतम बुद्धांचे अवशेष तब्बल 127 वर्षांनी भारतात परतले आहेत. ब्रिटिश राजवटीत हे अवशेष विदेशात गेले आणि गेल्या मे महिन्यात थायलंडमध्ये ते चक्क लिलावात विकले जाणार होते. मात्र, भारताने वेळीच हस्तक्षेप केला आणि आता हे अवशेष भारताच्या हाती आले आहेत.
उत्तर प्रदेशातील पिप्राहवामध्ये 1898 साली एका प्राचीन बौद्ध स्तुपाच्या उत्खननात हे अवशेष हाती लागले होते. भगवान गौतम बुद्धांच्या पवित्र अस्थींचे काही अंश, बौद्ध काळात कठीण कोरीव काम करण्यासाठी वापरला जाणारा सोपस्टोन, एक क्रिस्टल कास्केट, वाळूच्या खडकापासून तयार केलेली पेटी, काही सुवर्ण अलंकार आणि मौल्यवान दगड असे हे अवशेष आहेत. जगभरातील बौद्ध उपासकांना देण्यासाठी भगवान गौतम बुद्धांच्या अस्थींचे हे अंश थायलंडचा राजा सीयामला देण्यात आले होते.
बौद्ध काळात धार्मिक प्रतिमा आणि प्रतिके कोरण्यासाठी सोपस्टोनचा वापर होत असे. अस्थी कलश म्हणून जे भांडे त्या काळी वापरत ते देखील सोपस्टोनचेच असे. पिप्राहवा म्हणजेच प्राचीन कपिलवास्तू परिसरातील उत्खननात आढळलेले भगवान बुद्धांचे अवशेषही सोपस्टोनपासून तयार केलेल्या कलशात ठेवलेले होते.
गेल्या वर्षीच्या मे महिन्यात सुदबी या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून या अवशेषांचा लिलाव होणार होता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने हा लिलाव रोखण्यात आला. त्यापाठोपाठ थायलंड सरकारशी वाटाघाटी करून बुद्धांचे हे अवशेष भारताकडे परत आणण्यासाठीच्या हालचाली वेगाने करण्यात आल्या आणि आता तब्बल 127 वर्षांनी हे पवित्र अवशेष भारताच्या ताब्यात आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या सामाजिक माध्यमावर ट्विट करत ही बातमी दिली. भारताच्या ऐतिहासिक वारसा हक्काच्या दृष्टीने हा दिवस अत्यंत आनंदाचा आहे. भगवान बुद्धांचे पवित्र पिप्राहवा अवशेष 127 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आपल्या घरी परतले आहेत, असे मोदी म्हणतात.
विशेष म्हणजे आता थायलंडमधून भारताकडे आलेले भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थींचे अवशेष पिप्राहवा तथा प्राचीन कपिलवास्तू नगरीच्या परिसरात आढळले आहेत. याच ठिकाणी आढळलेल्या अस्थींच्या अवशेषांचा एक कलश कोलकात्याच्या संग्रहालयात ठेवण्यात आलेला आहे. त्यावर मौर्यकालीन ब्राह्मी लिपीत ‘या कलशात भगवान बुद्धाचे पवित्र अवशेष जे सुकीर्ती बंधूंनी शाक्य पंथाला भेट दिले ते ठेवलेले आहेत’, असे लिहिलेले आहे. याबद्दल काही जाणकारांच्या मते भगवान बुद्धांचे नातलग असलेल्या सुकीर्ती बंधूंच्या अस्थींचे हे संकलन असू शकते.