

नाशिक : जगभरात सध्या अनेक ठिकाणी युद्ध किंवा तणावपूर्ण स्थिती आहे. रशिया-युक्रेन युद्ध अजूनही धुमसत आहे. भारत-पाकिस्तानमध्ये युद्धसदृश स्थिती आहे. महासत्ता देशही एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी स्वत:चा दबादबा निर्माण करू पाहत आहेत. परिणामी, या देशांमध्ये सध्या व्यापार युद्धाने परिसीमा गाठली आहे. जेवढी युद्धकलेत, युद्धनीतीत प्रगती झाली, तेवढाच माणूस असुरक्षित झाला, ही वस्तुस्थिती आहे. अशात जगाला युद्धाची नव्हे, तर बुद्धांच्या तत्त्वज्ञानाची नितांत गरज आहे.
तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारानुसार, 'ज्याचा इंद्रियांवर ताबा आहे, जो सुखाच्या आहारी न जाता वायफळ बडबड न करता, परधनावर लक्ष न ठेवता सर्व प्राणिमात्रांना जीव लावतो, काळजी घेतो, तो खरा मानव आहे. भगवान गौतम बुद्धांनी पंचशील, अष्टांगिक मार्ग, पारमिता, आर्यसत्य यातून जगाला अहिंसेचा अनमोल विचार दिला आहे. त्यांनी सांगितलेल्या या तत्त्वांमध्ये अज्ञानी व्यक्ती एखाद्या बैलाप्रमाणे असतो. तो ज्ञानाने नाही तर आकाराने वाढतो. क्रोध पाळणे हे गरम कोळसा इतरांच्या अंगावर फेकण्यासाठी हातात धरल्याप्रमाणे आहे. यामुळे आपलाच हात भाजतो. या संसारात आनंद आणि दु:ख स्थायी असू शकत नाही. तुम्ही अंधारात असाल तर तुम्हाला प्रकाशाचा शोध घेणे आवश्यक आहे. निघून गेलेल्या काळात ध्यान केंद्रित करू नये. भविष्यासाठी स्वप्न पाहू नयेत, तर बुद्धीचा वापर वर्तमानात केंद्रित करावा. तुम्ही तुमच्या क्रोधासाठी दंडीत होत नाहीत, तर तुम्ही तुमच्या क्रोधामुळेच दंडीत होता. प्रत्येक व्यक्ती आपल्या आरोग्य आणि आजाराचा लेखक आहे. यामुळे आहार आणि दिनचर्या याकडे विशेष लक्ष द्यावे. ज्याप्रकारे मोठे वादळही मजबूत दगडाला हलवू शकत नाही, त्याचप्रकारे संत स्वत:च्या कौतुक आणि आलोचनेने प्रभावित होत नाहीत. तसेच मनच सर्व काही आहे, तुम्ही जसा विचार करता तसेच ते बनते. दु:ख, दु:खाचे कारण, दु:खातून मुक्ती व मुक्तचा मार्ग या आर्यसत्याचा मानवाने विचार केल्यास, त्यास जीवनाचा अर्थ उमजण्यास मदत होईल, असा हा बुद्धविचार आज जगाला गरजेचा आहे.
तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या विचाराला, तत्त्वज्ञानाला अंगीकारल्यास, संबंध जग शांततेच्या मार्गावर जाईल. आजच्या बुद्धपौर्णिमेनिमित्त तथागत भगवान गौतम बुद्ध यांना वंदन करूया.