

Bengaluru man arrested for filming women
बंगळूर : बंगळूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. बंगळूरमध्ये रस्त्यावर चालणाऱ्या महिलांचे व्हिडिओ त्यांच्या संमतीशिवाय चित्रित करून ते सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत. या प्रकरणी बनशंकरी पोलिसांनी एका २६ वर्षीय तरुणाला अटक केली. तो हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदवीधर आहे. संशयिताचे नाव गुरदीप सिंग असे असून तो केआर पूरम येथे राहतो. तो सध्या बेरोजगार आहे. तो त्याच्या भावासह भाड्याच्या घरात राहतो.
बनशंकरी पोलिसांनी १२ जून रोजी एका इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट होणाऱ्या आक्षेपार्ह व्हिडिओची गंभीर दखल घेतली. या प्रकरणी संबंधित अकाऊंटचा हँडलर असलेल्या गुरदीप सिंगला बुधवारी त्याच्या घरातून अटक केली. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडिया शाखेला एक इंस्टाग्राम हँडलर रस्त्यावर चालणाऱ्या महिलांचे व्हिडिओ काढून पोस्ट करत असल्याचे आढळून आले. त्यानंतर या प्रकरणी कारवाई करण्यात आली.
हे व्हिडिओ आक्षेपार्हरित्या स्लो मोशन स्वरुपात दाखवण्यात आले आहेत. या प्रकरणी बनशंकरी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रवीण होसूर यांनी स्वतःहून दखल घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७८ (पाठलाग) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, एका खासगी महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओवर आक्षेप नोंदवला होता. तिने म्हटले आहे की, नुकताच, चर्च रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी माझा एक व्हिडिओ शूट केला होता. तो अतिशय अयोग्य पद्धतीने व्हिडिओ काढण्यात आला होता. त्यानंतर तो व्हिडिओ माझ्या संमतीविना ऑनलाइन पोस्ट करण्यात आला होता. मी संबंधित अकाउंट असलेल्या व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
मी अनेक अकाउंटद्वारे रिपोर्ट करण्याचा प्रयत्न केला. पण त्यावरून असे सांगण्यात आले की ते कम्युनिटी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करते. मला इंस्टाग्रामबाबत असलेल्या कम्युनिटी मार्गदर्शक तत्त्वांबद्दल काहीच माहित नाही. रिल्स पाहून लोक माझे अकाउंट शोधत आहेत. मला अश्लील मेसेजीस येत आहेत, असे तिने इंस्टाग्राम अकाउंटवरील व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
माझ्यासारख्या अनेक महिलांचे व्हिडिओ त्या अकाऊंटवरून पोस्ट केले गेले आहेत. त्या अकाऊंटचे १० हजार फॉलोअर्स असल्याचे सांगत तिने बंगळूर शहर पोलिस आणि सायबर क्राईम विभागाकडे ते अकाऊंट बंद करण्यासाठी टॅग केले.
द टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पोलीस उपनिरीक्षक होसूर यांनी तक्रारीत म्हटले आहे की आम्ही अशा लोकांवर लक्ष ठेवून होतो की जे राजकीय पक्ष, जात- धर्म याबाबत आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करुन ते सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो. १२ जूनच्या संध्याकाळी पोलिसांना गुरदीपचे इंस्टाग्राम सापडले. आम्ही इंस्टाग्राममार्फत अकाऊंट डिलीट अथवा ते बंद करण्यासाठी न्यायालयाकडून आदेश मिळविण्यासाठी काम करत आहोत.
गुरदीपने सुमारे ४५ व्हिडिओ पोस्ट केला आहेत. हे सर्व रील स्वरुपात आहेत. हे सर्व आक्षेपार्ह पद्धतीने अधिक व्ह्यूज मिळविण्यासाठी स्लो मोशनमध्ये दाखवण्यात आले होते, असे पोलिसांना तपासात आढळून आले आहे.