

अनंत एक निवृत्त सरकारी कर्मचारी. त्यांच्या आयुष्यात फारसे काही नवे घडत नव्हते. सकाळी उठणे, चहा पिणे, वर्तमानपत्र वाचणे आणि व्हॉटस्अपवर आलेले दोन-चार फॉरवर्डेड मेसेज, जोक्स वाचून हसणे. दररोजचा असा ठरलेला त्यांचा हा दिनक्रम. पण एका सकाळी त्यांच्या मोबाईलवर व्हॉटस्अप कॉल आला. स्क्रीनवर नाव झळकत होते, आदित्य. सौदी अरेबियात फिरायला गेलेला त्यांचा हा पुतण्या. अनंत यांनी उत्साहात कॉल उचलला. समोरून आवाज ओळखीचा, काहीसा घाबरलेला. “काका, इकडे एक अपघात झाला आहे. पोलिसांनी मला थांबवले आहे. मी अडचणीत आहे. तातडीने 1 लाख रुपये पाठवा. मी नंतर सगळे समजावून सांगतो.”
आवाज अगदी तसाच! वर्षानुवर्षे आदित्यचा आवाज ऐकत आलेल्या अनंत यांना क्षणभरही शंका आली नाही. त्यांनी तातडीने दिलेल्या लिंकवर क्लिक करून पैसे ट्रान्सफर केले. पण काही वेळाने त्यांचा मूळ आदित्यचा कॉल आला. यावेळी अनंत यांनी त्याला विचारले, “अरे काय झाले होते, कशासाठी पैसे हवे होते.” “काका, मी तर कामावर होतो, कोणते पैसे?” असे आदित्य म्हणताच अनंत यांची झोप उडाली. त्यांना लक्षात आले, फसवणूक झाली आहे! सायबर चोरट्यांनी आदित्यचे सोशल मीडियावरील व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिप्स वापरून त्याचा व्हॉईस क्लोन तयार केला होता. त्या क्लोनचा वापर करून बनावट कॉल करून गंडा घातला होता.
हे प्रकरण केवळ अनंत आणि आदित्य यांच्यापुरते मर्यादित नाही. देशभरातून अशाच प्रकारे व्हॉईस क्लोन करून फसवणुकीच्या घटनांचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढत आहे. पूर्वी नुसते मेसेजेस, ईमेल्स, लिंकद्वारे फसवणूक केली जात होती. आता सायबर चोरटे आवाजही चोरत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे तंत्रज्ञान जितके प्रगत होत आहे, तितकीच सायबर गुन्हेगारी अधिक धोकादायक होत चालली आहे. आवाजावर विश्वास ठेवून कोणताही आर्थिक व्यवहार करणे आता धोक्याचे ठरू शकते.
व्हॉईस क्लोनिंग : या प्रकाराला व्हॉईस क्लोनिंग स्कॅम म्हणतात. गुन्हेगार व्यक्तीच्या सोशल मीडियावर असलेल्या ऑडिओ किंवा व्हिडीओ क्लिप्सचा वापर करून त्यांचा आवाज हुबेहूब नक्कल करणारे एआय टूल्स वापरतात. नंतर त्या आवाजात कॉल केला जातो. नातेवाईक, मित्र किंवा वरिष्ठ असल्याचा ड्रामा केला जातो. आपत्कालीन परिस्थितीचे नाटक करत पैसे मागितले जातात. कधी कधी तर व्हिडीओ कॉलसाठी डीपफेक व्हिडीओ वापरून चेहराही खरा वाटेल असा दाखवला जातो!
व्हॉईस क्लोनिंगपासून वाचण्यासाठी हे कराच : समोरच्याच्या बोलण्यावर आणि माहितीवर लगेच विश्वास ठेवू नका. कोणताही कॉल आला आणि पैसे मागितले, तर लगेच पैसे पाठवू नका. दुसर्या माध्यमातून खात्री करा. त्या व्यक्तीशी थेट कॉल करून किंवा मेसेज करून विचारपूस करा. गुप्त कोड वर्ड ठरवा. आपल्या कुटुंबातील व्यक्तींमध्ये एक गुप्त शब्द ठरवा, जो इमर्जन्सीवेळी ओळख पटवण्यासाठी वापरता येईल.
सोशल मीडियावर वैयक्तिक व्हिडीओ/ऑडिओ अपलोड करताना सावधगिरी बाळगा. सायबर चोरटे हेच क्लिप्स वापरून आवाजाची नक्कल करतात. अशा घटना घडल्या तर त्वरित सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार करा.